जयपूर : राजस्थानमध्ये वसुंधरा राजे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार असताना कायदा आणि सुव्यवस्था, गावोगावी वीजपुरवठा आणि राबवलेल्या कल्याणकारी योजना अशोक गेहलोत यांच्या सरकारच्या काळात अदृश्य झाल्या. केवळ जादूगारच असे करू शकतो, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी मंगळवारी केली.
हेही वाचा >>> ‘अल्प युद्धविरामा’चा विचार करण्यास तयार; इस्रायलच्या पंतप्रधानांची भूमिका
नावा या विधानसभा मतदारसंघात जाहीर सभेत बोलताना शहा म्हणाले, की राजस्थानातील काँग्रेस सरकार हे सर्वात भ्रष्टाचारी आहे. लांगूलचालनाच्या सर्व सीमा या सरकारने ओलांडल्या आहेत. अशा या सरकारला जनतेने हटवावे. शहा यांनी या वेळी कन्हैयालाल यांच्या हत्येसह विविध धार्मिक वादग्रस्त घटना, बेकायदेशीर खाणकाम, भरती परीक्षा प्रश्नपत्रिका फुटीचा घोटाळा आदी विषयांवर गेहलोत सरकारवर टीका केली. गेहलोत यांचे वडील सुप्रसिद्ध जादूगार होते. त्याचा संदर्भ घेत शहा म्हणाले, की गेहलोत यांनी भाजप सरकारच्या काळातील सुधारणा आपल्या सरकारच्या काळात गायब केल्या. गेहलोत सरकारने राजस्थानसारखी वीरांची भूमी नष्ट करण्यात कोणतीही कसर सोडली नाही असे ते म्हणाले. विविध खात्यांमध्ये घोटाळे झाल्याचा आरोप करत शहा म्हणाले की, खाण विभागात ६६ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून ‘जलजीवन मोहिमे’च्या नावाखाली २० हजार कोटी रुपयांची उधळपट्टी करण्यात आली आहे. गेहलोत यांनी तुष्टीकरणाद्वारे राजकारणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. सुरळीत वीजपुरवठा, आरोग्य सुरक्षा किंवा कायदा व सुव्यवस्था सुधारणा असो, हे काम फक्त भाजप सरकारच करू शकते असा दावा त्यांनी केला.