‘महादेव’ या ऑनलाइन बेटिंग अॅपच्या प्रवर्तकांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना आतापर्यंत ५०८ कोटी रुपये दिल्याचा दावा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी ( ३ नोव्हेंबर ) केला. तसेच हे प्रकरण चौकशीच्या कक्षेत येत असल्याचे सांगितले. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री बघेल यांना लक्ष्य केलं आहे. अशातच ‘महादेव’ बेटिंग अॅप प्रकरणातील आरोपी शुभम सोनीनं मुख्यमंत्री बघेल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
मनी लॉड्रिंग प्रकरणात ईडीनं शुभम सोनीला फरार घोषित केलं आहे. शुभम सोनीच्या सांगण्यावरून अटकेत असलेला असीम दास हा कथितरित्या भूपेश बघेल यांना पैसे पोहचवत असे. आता शुभम सोनीनं दुबईतून एक व्हिडीओ प्रसारित केला आहे. त्यात बघेल यांच्या सांगण्यावरूनच दुबईला गेल्याचं सोनीनं म्हटलं आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा : “…अन् यांनी ‘महादेव’ नावही सोडलं नाही”, पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका
मीच ‘महादेव’ बेटिंग अॅपचा मालक असल्याचं शुभम सोनीनं सांगितलं आहे. आपले पॅन कार्ड, आधार कार्ड आणि पासपोर्ट दाखवत सोनीनं दावा केला की, २०२१ साली ‘महादेव’ बेटिंग अॅपची सुरूवात केली होती.
“संरक्षणासाठी महिन्याकाठी १० लाख रूपये द्यायचो”
सोनी म्हणाला, “मी भिलाई येथे बुकी चालू केली होती. त्यातून चांगला पैसा मिळत होता. बुकी चालू केल्याचं समोर आल्यानंतर माझ्या येथे काम करणाऱ्या मुलांना पकडण्यात आलं. नंतर मी वर्मांच्या संपर्कात आलो. वर्मांना संरक्षणासाठी मी महिन्याकाठी १० लाख रूपये द्यायचो.”
“मुख्यमंत्र्यांनी काम वाढवण्याच्या सूचना दिल्या अन्…”
“नंतरही माझ्या मुलांना पकडले गेले. तेव्हा वर्मांनी माझी मुख्यमंत्र्यांबरोबर भेट घालून दिली. तिथे बिट्टू आणि मुख्यमंत्र्यांनी काम वाढवण्याच्या सूचना दिल्या आणि दुबईला जाण्यास सांगितलं. माझे काम चांगलं चालू होतं. पण, नंतर माझी मुले पकडली गेली. मी रायपूरला आलो, त्यानंतर वर्मा आणि गिरीश तिवारीच्या मार्फत तत्कालीन पोलीस अधिक्षक प्रशांत अग्रवलांना भेटलो,” असं सोनीनं सांगितलं.
हेही वाचा : “भाजपा स्वबळावर निवडणूक लढवू शकत नाही, म्हणून…”, भूपेश बघेल यांची टीका
“मी बिट्टू भैय्यांमार्फत ५०८ कोटी रूपये दिले”
“प्रशांत अग्रवाल यांच्या फोनवरून माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं. मुख्यमंत्री म्हणाले, ‘मी तुला काम सांभाळण्यासाठी पाठवलं होतं. पण, तू बॉस झालाय.’ मी विनंती केल्यावर ‘प्रशांत अग्रवाल यांच्याशी बोला. ते तुम्हाला सांगतील,’ असं मुख्यमंत्री बोलले. त्यानंतर प्रशांत अग्रवाल यांनी सांगितल्यानुसार, मी बिट्टू भैय्यांमार्फत ५०८ कोटी रूपये दिले. तरीही मला अडचणीत आणण्याचं काम केलं जात आहे,” असा गौप्यस्फोट सोनीनं केला.
“मला भारतात यायचे आहे”
“मी कुणाला किती, कुणाला आणि कधी पैसे दिलेत, हे माझ्या लेखी निवेदनात लिहिलं आहे. मी राजकीय व्यवस्थेत अडकलो आहे. मला भारतात यायचे आहे. मदत करा,” अशी विनंती सोनीनं केंद्र सरकारकडे केली आहे. ‘एनडीटीव्ही’नं याबद्दल वृत्त दिलं आहे.