पश्चिम बंगालमधील संत्रागाछी रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलावरील चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना रेल्वे मंत्रालयाने मदत जाहीर केली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची तर गंभीर जखमी झालेल्यांच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या समितीचीही स्थापना करण्यात आली आहे.
संत्रागाछी रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलावर मंगळवारी संध्याकाळी चेंगराचेंगरी झाली. त्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला तर अन्य १७ जण जखमी झाले. नागरकोईल-शालिमार एक्स्प्रेस गाडी आणि दोन ईएमयू उपनगरी गाड्या एकाच वेळी स्टेशनवर आल्या आणि प्रवाशांनी गाड्या पकडण्यासाठी धाव घेतली. त्या वेळी ही घटना घडली. गाडीतून उतरणारे आणि गाडी पकडण्यासाठी धावणारे प्रवासी यामुळे पादचारी पुलावर गर्दी झाली, असे सांगितले जाते.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यानंतर त्यांनी रुग्णालयात जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली. राज्य सरकारच्यावतीने मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपये आणि जखमींना १ लाख रुपये मदत दिली जाईल, असे बॅनर्जींनी सांगितले. या घटनेची रेल्वे प्रशासनाने सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना रेल्वे मंत्रालयातर्फे पाच लाख रुपये, गंभीर जखमी झालेल्यांच्या कुटुंबीयांना १ लाख रुपये तर किरकोळ जखमी झालेल्यांच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपयांची मदत दिली जाईल, असे सांगितले. तसेच या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी दिले.