West Bengal Accident : देशभरात रोज वेगवेगळ्या अपघाताच्या घटना घडत असल्याचं पाहायला मिळतं. दिवसेंदिवस अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. अनेकवेळा तर अपघातांचे फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. यामध्ये काही अपघाताचे व्हिडीओ अक्षरशः अंगावर शहारे आणणारे असतात. आता पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यात एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. एका भरधाव कारने तीन ई-रिक्षांना धडक दिल्याने ६ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यात एका भरधाव एसयूव्ही गाडीने तीन ई-रिक्षांना धडक जोराने धडक दिली. या धडकेत ई-रिक्षांमधील तीन महिला आणि एका मुलासह सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर ८ जण जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी घडली. या घटनेत जखमी झालेल्यांपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सांगितली जात आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
दरम्यान, तीन ई-रिक्षामधून काही प्रवासी घरी परतत होते. पण त्याचवेळी विरुद्ध बाजूने येणाऱ्या एका भरधाव एसयूव्हीने तीन ई-रिक्षांना जोराची धडक दिली. या धडकेत इलेक्ट्रिक वाहनांमधील सहा जण जागीच ठार झाले आणि आठ जण जखमी झाले. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. या अपघाताच्या घटनेत पोलिसांनी तपास सुरू केला असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.
या घटनेची माहिती देताना एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, “ई-रिक्षा चालवणारे लोक ईदसाठी खरेदी करून घरी परतत असताना ही घटना घडली. विरुद्ध दिशेकडून भरधाव वेगात येणाऱ्या एसयूव्हीने एकापाठोपाठ एक तीन ई-रिक्षांना धडक दिली. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांतून प्रवास करणाऱ्या ६ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ८ जण जखमी झाले. ही घटना घडल्यानंतर कार चालक घटनास्थळापासून पळून गेला. आता पोलीस कार चालकाचा शोध घेत आहेत.