भाजप कार्यकारी समितीच्या बैठकीला गैरहजर, पक्षांतर केलेले अनेक नेते स्वगृही परतण्याची चर्चा

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेसला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते मुकुल रॉय आणि रजीब बंदोपाध्याय हे राज्यातील निवडणुकीनंतर उसळलेल्या हिंसाचाराबाबत चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीला गैरहजर राहिल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

मुकुल रॉय यांनी अलीकडेच तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी आणि सुब्रत बक्षी यांच्याशी जवळीक साधली. त्यानंतर राजकीय वर्तुळात रॉय स्वगृही परतण्याच्या चर्चेने जोर धरला. रॉय हे मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला गैरहजर राहिले. त्यानंतर वैयक्तिक कारणास्तव ते बैठकीला हजर राहू शकले नाहीत अशी सारवासारव राज्य भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांना करावी लागली. मात्र या बैठकीची माहिती आपल्याला नव्हती, असे भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष असलेल्या रॉय यांनी स्पष्ट केले. तृणमूल काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री रजीब बंदोपाध्याय यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला, मात्र ते पराभूत झाले. बंदोपाध्याय हेही वैयक्तिक कारणास्तव बैठकीला हजर राहू शकले नाहीत, असे घोष यांना स्पष्ट करावे लागले.

गुहा यांनी ममतांना पत्र लिहून स्वगृही परतण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. भाजपमध्ये घुसमट होत आहे, दीदी तुमच्याविना राहू शकत नाही, तुमची इच्छा असेल तेव्हा पक्षात पुन्हा प्रवेश द्यावा, अशी कळकळीची विनंती गुहा यांनी ममतांना त्या पत्राद्वारे अलीकडेच केली होती.

रॉय, बंदोपाध्याय यांचे नाव आघाडीवर

पश्चिम बंगाल विधानसभेच्या निकालानंतर राज्यात तिसऱ्यांदा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे सरकार आल्यानंतर अवघ्या काही दिवसातच भाजपवासी झालेले पूर्वाश्रमीचे तृणमूल काँग्रेसचे नेते स्वगृही परतणार असल्याच्या चर्चेला उधाण आले. त्यामध्ये रॉय, बंदोपाध्याय यांच्यासह विधानसभेच्या माजी उपाध्यक्षा सोनाली गुहा यांचेही नाव आघाडीवर आहे.

Story img Loader