पश्चिम बंगालमध्ये जनतेचा कौल ममता दीदींच्या बाजूने झुकल्यानंतर राजकीय पटलावरून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. समाजवादी पार्टीचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी भाजपावर टीकेची झोड उठवली आहे. ट्विटरवरून त्यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवत भाजपावर निशाणा साधला आहे. तसंच ममता बॅनर्जी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘पश्चिम बंगालमध्ये भाजपा द्वेषाचं राजकारण पराभूत करणारी जागरूक जनता, आक्रमकपणे लढा देण्याऱ्या ममता बॅनर्जी आणि टीएमसीच्या सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना शुभेच्छा’ असं ट्विट त्यांनी केलं आहे.

ट्विटमध्ये त्यांनी ममता दीदींवर आक्षेपार्ह केलेल्या टीकेचाही समाचार घेतला आहे. ‘भाजपानं एक महिलेवर खालच्या पातळीवर केलेल्या टीकेचं जनतेनं दिलेलं उत्तर आहे. ‘दीदी ओ दीदी’ ला चोख प्रत्युत्तर दिलं आहे.’, असंही त्यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे.

ममता बॅनर्जी गेल्या १० वर्षांपासून सत्तेत असून पश्चिम बंगालमधील जनता पुन्हा एकदा त्यांच्या हाती सत्तेच्या चाव्या कल आहे. ममता बॅनर्जी यांच्यासमोर भाजपाने कडवं आव्हान निर्माण केलं होतं. देशात करोना स्थिती असताना भाजपा पूर्ण ताकदीने पश्चिम बंगाल निवडणुकीत उतरली होती. मिथुन चक्रवर्तीसह दिग्गज नेत्यांची फौज प्रचाराला आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी आपली ताकद लावत मोठ्या सभा घेतल्या होत्या. मात्र जनतेनं ममता दीदींच्या बाजूने कौल दिल्यानं भाजपाच्या कार्यालयात शुकशुकाट पाहायला मिळत आहे.