पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची विजयाकडे वाटचाल सुरु झाल्यानंतर भाजपा विरोधी पक्षांच्या नेत्यांनी ममता दीदींवर कौतुकाचा वर्षाव ट्विटरवर केला आहे. समाजवादी पार्टी, आम आदमी पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, पीपुल्स डेमोक्रेटिक पार्टी यांनी ममता दिदींचं कौतुक करत भाजपावर निशाणा साधला आहे. भाजपानं पश्चिम बंगालमध्ये पूर्ण ताकद लावली होती. सत्ता भाजपाचीच येणार या अविर्भावत भाजपाचे नेते, प्रवक्ते वावरत होते. मात्र निवडणुकीचा कौल ममता दीदीच्या बाजूने झुकल्याने भाजपावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शऱद पवार यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन केलं आहे. यावेळी त्यांनी लोकांच्या भल्यासाठी तसंच करोनाशी लढण्यासाठी एकत्रित काम करुया असंही म्हटलं आहे. शरद पवार यांनी ट्विट केलं आहे.

भाजपाचे विरोधक असलेल्या आम आदमी पार्टीनं ममता दीदींना शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ममता दीदींच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त करणारं ट्वीट केलं आहे. तसंच पश्चिम बंगालमधील जनतेचं अभिनंदन केलं आहे.

काश्मीरमधील पीपुल्स डेमोक्रेटिक पार्टीकडूनही ममता दीदींचं अभिनंदन करण्यात आलं आहे. मेहबूबा मुफ्ती यांनी ममता दीदींना शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर द्वेष पसरवण्याऱ्यांना धडा शिकवल्याबद्दल पश्चिम बंगालच्या जनतेचे आभार मानले आहेत.

समाजवादी पार्टीचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी भाजपावर टीकेची झोड उठवली आहे.‘पश्चिम बंगालमध्ये भाजपा द्वेषाचं राजकारण पराभूत करणारी जागरूक जनता, आक्रमकपणे लढा देण्याऱ्या ममता बॅनर्जी आणि टीएमसीच्या सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना शुभेच्छा’ असं ट्विट त्यांनी केलं आहे.

ममता दीदींना पराभूत करण्यासाठी भाजपाने संपूर्ण शक्ती पणाला लावली होती. मात्र ममता दीदींनी पश्चिम बंगालचा गड राखला. तसेच पश्चिम बंगालमध्ये तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत. यामुळे भाजपा विरोधी पक्षांना स्फुरण मिळाल्याचं दिसत आहे.

Story img Loader