Saraswati Puja Controversy in Kolkata: भारतीय जनता पक्षाच्या विधानसभा विरोधी पक्षनेत्यांसह एकूण चार आमदारांचं महिन्याभरासाठी निलंबन करण्याचा निर्णय पश्चिम बंगालचे विधानसभा अध्यक्ष बिमन बॅनर्जी यांनी सोमवारी घेतला. अधिवेशनाचं कामकाज चालू असताना सरस्वती पूजेच्या मुद्द्यावरून सभागृहात गदारोळ चालू झाला. यावेळी भाजपाच्या आमदारांनी केलेल्या वर्तनावर करावाई करावी, अशी मागणी करणारा प्रस्ताव सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे आमदार निर्मल घोष यांनी मांडला. हा प्रस्ताव स्वीकारत अध्यक्षांनी विधानसभा विरोधी पक्षनेते सुवेंदु अधिकारी यांच्यासह चार भाजपा आमदारांना निलंबित केलं.

नेमकं काय घडलं विधानसभेत?

पश्चिम बंगालच्या विधानसभेत सोमवारी भाजपा आमदार अग्निमित्रा पॉल यांनी सरस्वती पूजेचा मुद्दा उपस्थित करत त्यावर चर्चेची मागणी केली. अध्यक्षांनी पॉल यांचा हा प्रस्ताव दाखल करून घेतला, मात्र त्यावर चर्चा घेण्यास नकार दिला. यामुळे विरोधी बाकांवर बसलेल्या भाजपा आमदारांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. काही आमदार अध्यक्षांसमोरच्या रिकाम्या जागेत येऊन आपला निषेध नोंदवू लागले. यापैकी काही आमदारांनी काही शासकीय कामकाजाची कागदपत्र फाडली आणि ती अध्यक्षांच्या दिशेनं भिरकावली.

यावेळी अध्यक्ष बिमन बॅनर्जी यांनी गोंधळ घालणाऱ्या आमदारांना संभाव्य कारवाईबाबत इशारादेखील दिला. मात्र, भाजपाच्या आमदारांनी गोंधळ चालूच ठेवला. यानंतर प्रस्तावावर चर्चेस परवानगी न मिळाल्यामुळे भाजपा आमदारांनी सभात्याग केला. तृणमूल काँग्रेसचे आमदार निर्मल घोष यांनी गोंधळ घालणारे सुवेंदु अधिकारी व भाजपाच्या इतर आमदारांविरोधात निलंबनाची कारवाई केली जावी, अशी मागणी करणारा प्रस्ताव सभागृहात मांडला. हा प्रस्ताव अध्यक्षांनी मंजूर केला. यानुसार विरोधी पक्षनेते सुवेंदु अधिकारी, अग्निमित्रा पॉल, बंकिम घोष आणि विश्वनाथ करक यांना निलंबित करण्यात आलं आहे.

ंकाय आहे सरस्वती पूजेचा वाद?

गेल्या दोन आठवड्यांपासून पश्चिम बंगालमध्ये कोलकात्यातील सरस्वती पूजेचा मुद्दा वादात सापडला आहे. २९ जानेवारी रोजी कोलकात्यातील जोगेशचंद्र लॉ कॉलेजमध्ये काही विद्यार्थ्यांनी सरस्वती पूजेचं आयोजन केलं होतं. मात्र, तृणमूल काँग्रेस छात्र परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला पूजा करण्यापासून मज्जाव केला, धमकावलं, बलात्काराची धमकीही दिली, असा आरोप काही विद्यार्थिनींनी केला आहे. याविरोधात कोलकाता उच्च न्यायालयात याचिकादेखील दाखल करण्यात आली असून त्यावर न्यायालयाने पोलिसांना पूजा कोणत्याही अडथळ्याशिवाय होईल, याची काळजी घेण्याचे आदेश दिले.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये पोलीस संरक्षणात सरस्वती पूजा घ्यावी लागत आहे, असा मुद्दा उपस्थित करत विरोधात असणाऱ्या भारतीय जनता पक्षानं हा मुद्दा लावून धरला आहे. नुकत्याच सुरू झालेल्या विधिमंडळ अधिवेशनात या मुद्द्यावर चर्चेची मागणी भाजपाकडून करण्यात आली, मात्र, अध्यक्षांनी ही परवानगी फेटाळल्यानंतर गदारोळ झाला.

Story img Loader