Swami Vivekananda Narendra Modi Comparison :पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पार्टीचे खासदार सौमित्र खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वामी विवेकानंद यांच्याशी तुलना केली आहे. स्वामी विवेकानंद यांनी पंतप्रधान मोदी यांच्या रुपात पुनर्जन्म घेतला आहे, असे सौमित्र खान म्हणाले आहेत. त्यांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला असून तृणमूल काँग्रेसने आक्रमक पवित्रा धारण केला आहे.
सौमित्र खान नेमकं काय म्हणाले?
सौमित्र खान हे पश्चिम बंगालमधील भाजपाचे खासदार आहेत. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी सहभाग नोंदवला. त्यानंतर खान यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी बोलताना “स्वामी विवेकानंद यांनी पंतप्रधान मोदी यांच्या रुपात पुनर्जन्म घेतला आहे. स्वामी आपल्यासाठी देवासमान आहेत. मोदी यांनी देशासाठी जीवन समर्पित केले आहे. ते आधुनिक भारताचे स्वामी विवेकानंद आहेत असे मला वाटते,” असे सौमित्र खान म्हणाले.
हेही वाचा >>> Amazon Layoffs : अॅमेझॉनमध्ये नोकरकपातीस सुरुवात, भारतात १००० जणांची नोकरी जाण्याची भीती
सौमित्र खान यांच्या विधानानंतर तृणमूल काँग्रेस आक्रमक
सौमित्र खान यांच्या या विधानानंतर तृणमूल काँग्रेसने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. कोलकात्याचे महापौर फिरहाद हकीम यांनी खान यांच्यावर टीका केली आहे. खान यांचे विधान म्हणजे स्वामी विवेकानंद यांचा अवमान आहे. स्वामी विवेकानंद यांची विचारधारा ही भाजपाच्या विचारसरणीच्या अगदी विरोधात आहे, असे हकीम म्हणाले.
हेही वाचा >>> जगातील सर्वात लांब नदी क्रूझ ‘एमव्ही गंगा विलास’ प्रवासासाठी सज्ज; आज पंतप्रधान मोदी दाखवणार हिरवा झेंडा
याआधीही मोदींची स्वामी विवेकानंद यांच्याशी तुलना
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना स्वामी विवेकानंद यांच्याशी करण्याचा हा पहिलाच प्रयत्न नाही. याआधी बिहार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नित्यानंद राय यांनीदेखील सौमित्र खान यांच्याप्रमाणेच विधान केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वामी विवेकानंद यांचे अवतार आहेत, असे नित्यानंद राय म्हणाले होते.