पीटीआय, कोलकाता / बोंगाईगाव (आसाम)

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी राज्यात स्वबळावर लढण्याची घोषणा करून बुधवारी ‘इंडिया’ आघाडीला मोठा धक्का दिला. जागावाटपासाठी काँग्रेसला दिलेला प्रस्ताव सपशेल फेटाळण्यात आल्यामुळे आता आपल्या पक्षाने एकट्याने निवडणुका लढण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी जाहीर केले. यावर काँग्रेसने सावध पवित्रा घेत ममता बॅनर्जी यांच्याशिवाय ‘इंडिया’ आघाडीचा विचार करू शकत नसल्याचे म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांपासून तृणमूल आणि काँग्रेसमध्ये पश्चिम बंगालमधील जागावाटपावरून तणाव असल्याची चर्चा होती. २०१९च्या निकालांच्या आधारे काँग्रेसला दोन जागा देण्याची तयारी ममता यांनी केली होती. तर लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी जागांसाठी ममतांकडे याचना करणार नाही, असे सांगत आक्रमक पवित्रा घेतला होता. या पार्श्वभूमीवर बुधवारी बॅनर्जी यांनी केलेली घोषणा महत्त्वाची मानली जात आहे. दुसरीकडे राष्ट्रीय पातळीवर ‘इंडिया’ आघाडीचे त्यांनी जोरदार समर्थनही केले. राष्ट्रीय पातळीवर आघाडीचे सदस्य या नात्याने निकालानंतर आमची भूमिका स्पष्ट करू. भाजपला पराभूत करण्यासाठी जे शक्य आहे, ते करू असे त्या म्हणाल्या.

हेही वाचा >>>माझ्यावर जास्तीतजास्त खटले दाखल करा; राहुल गांधींचे आसाम सरकारला आव्हान

ममता बॅनर्जींच्या या भूमिकेवर काँग्रेसने सावध प्रतिक्रिया दिली आहे. ‘भारत जोडो न्याय यात्रे’निमित्त आसामच्या बोंगाईगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले, की ममता बॅनर्जी या ‘इंडिया’ आघाडीचा मोठा आधारस्तंभ आहेत. त्यांच्याशिवाय आम्ही आघाडीचा विचार करू शकत नाही. पश्चिम बंगालमध्येही ‘इंडिया’ आघाडीच लढेल आणि सर्व पक्ष त्यात सहभागी होतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

रणनीतीचा भाग ?

ममता बॅनर्जी यांनी केलेली घोषणा म्हणजे ‘इंडिया’ आघाडीच्या रणनीतीचा भाग असू शकेल, अशी शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसने व्यक्त केली आहे. ममता आणि त्यांचा पक्ष या आघाडीतील महत्त्वाचा घटक आहे. त्या आमच्याबरोबर आहेत आणि भाजपविरोधात आम्ही ठामपणे उभे आहोत. आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, असा दावा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रवक्ते क्लाइड क्रॅस्टो यांनी केला.

हेही वाचा >>>न्यू हॅम्पशायर ‘प्रायमरी’मध्ये ट्रम्प विजयी

आघाडीसाठी मृत्युघंटा – भाजप

ममता बॅनर्जी यांची स्वबळावर लढण्याची घोषणा ही ‘इंडिया’ आघाडीसाठी अखेरची मृत्युघंटा ठरणार असल्याचा दावा बुधवारी भाजपने केला. ‘‘निकालानंतरही आपले महत्त्व कायम राहावे, असे वाटत असल्याने ममतांनी सर्व जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. आघाडीचे नेतृत्व करण्यासाठी त्यांचे नाव कोणीही घेतले नाही, याचे त्यांना नैराश्य आले आहे,’’ अशी टीका भाजपच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी केली.

काँग्रेसला स्वबळावर ३०० जागा लढू दे. सर्व प्रादेशिक पक्ष एकत्र आहेत आणि ते उर्वरित जागा लढतील. मात्र पश्चिम बंगालमध्ये आम्ही कोणताही हस्तक्षेप सहन करणार नाही. – ममता बॅनर्जीमुख्यमंत्री, पश्चिम बंगाल

भाजपला पराभूत करण्यास अग्रक्रम असल्याचे बॅनर्जी यांनी स्पष्ट केले आहे. ती आमची सर्वांची प्राथमिक जबाबदारी आहे. हीच भावना ठेवून आमची यात्रा उद्या (गुरुवारी) पश्चिम बंगालमध्ये प्रवेश करेल. – जयराम रमेशसरचिटणीस, काँग्रेस

Story img Loader