पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विमानाचं लँडिग होत असतानाच दुसरं एक विमान समोर आलं होतं. यावेळी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती. मात्र वैमानिकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. ममता बॅनर्जी यांनी आपला जीव वाचवल्याबद्दल वैमानिकाचे आभार मानले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ममता बॅनर्जी यांनी सोमवारी विधानसभेत या घटनेबद्दल सांगताना म्हटलं की, “मी बनारसमधून परतत होती. यावेळी अचानक दुसरं विमान माझ्या विमानासमोर आलं. वैमानिकाने प्रसंगावधान दाखवलं आणि विमान अचानक ८ हजार फूट खाली आणलं. १० सेकंद जरी उशीर झाला असता तर मोठी दुर्घटना झाली असती. त्या घटनेनंतर माझ्या पाठीला आणि शरीराला वेदना होत आहेत”.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, यामागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. आम्हाला अद्याप एटीसी आणि डीजीसीएकडून कोणताही रिपोर्ट मिळालेला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, वाराणसीमधून परतत असताना ममता बॅनर्जी Dassault Falcon 2000 विमानातून प्रवास करत होत्या. हे हलक्या वजनाचं विमान आहे. या विमानात कर्मचाऱ्यांसहित जास्तीत जास्त १९ लोक प्रवास करु शकतात.

याआधी सांगण्यात आलं होतं एअर टर्ब्यूलन्सचं कारण

ममता बॅनर्जी अखिलेश यादव यांच्या प्रचारासाठी ३ मार्चला वाराणसीत पोहोचल्या होत्या. प्रचारानंतर विमानाने त्या कोलकाताला परतल्या. कोलकाता विमानतळावर लँडिंग होत असताना हा प्रकार घडला. मात्र त्यावेळी एअर टर्ब्यूलन्सचं (Air Turbulence) कारण सांगण्यात आलं होतं. एअर टर्ब्यूलन्समुळे विमानात झटके बसल्याचं सांगण्यात आलं होतं. आकाशात उडत असताना हवा अनियंत्रित होऊन विमानाला धडकते तेव्हा एअर टर्ब्यूलन्स निर्माण होतं. ज्यामुळे विमान अनियंत्रित होऊन धक्के जाणवतात.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: West bengal cm mamata banerjee aircraft collision banaras to kolkata sgy