पश्चिम बंगालमध्ये राज्य सरकारमध्ये सत्तास्थानी असलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि केंद्रातील मोदी सरकारचा संघर्ष काही नवा नाही. अशातच सध्या बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर आणि ममता बॅनर्जी यांच्यातील संबंधांमध्येही तणाव निर्माण झालाय. त्यातच राज्यपालांनी बंगालला लोकशाहीसाठीचा ‘गॅस चेंबर’ म्हटलं आणि हा तणाव कमालीचा वाढला. याचाच परिणाम म्हणून ममता बॅनर्जी यांनी राज्यपाल धनखर यांना ट्विटरवर थेट ब्लॉक केलंय. इतकंच नाही, तर याची माहिती स्वतः ममता बॅनर्जींनीच माध्यमांना दिलीय.
नेमका घटनाक्रम काय?
ममता बॅनर्जी म्हणाल्या, “मी एका गोष्टीसाठी आधीच माफी मागते. राज्यपाल दररोज काहीतरी ट्वीट करून मला किंवा माझ्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत असतात. ते असंवैधानिक आणि अनैतिक वक्तव्य करतात. ते सल्ला न देण्याचे निर्देश देतात. लोकनियुक्त सरकार वेठबिगार कामगार झालीय. मला याचा राग येतो. त्यामुळे मी राज्यपालांना ट्विटरवर ब्लॉक केलं आहे.”
“राज्यपालांकडून अनेकदा मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना धमकी”
“राज्यपालांनी अनेकदा मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना धमकी दिलीय. याबाबत मी अनेकदा पंतप्रधानांना पत्र लिहून तक्रार केलीय. मात्र, अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही,” असंही ममता बॅनर्जी यांनी सांगितलं.
राज्यपाल जगदीप धनखर नेमकं काय म्हणाले होते?
पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर यांनी महात्मा गांधी पुण्यातिथीच्या दिवशी ममता बॅनर्जी सरकारवर सडकून टीका केली होती. ते म्हणाले होते, “मी बंगालच्या पवित्र भूमिला हिंसेमुळे रक्ताने माखलेलं पाहू शकत नाही. मानवाधिकारांचा चिरडण्यासाठी बंगाल एक प्रयोगशाळा बनत आहे. हे राज्य लोकशाहीसाठी गॅस चेंबर होत आहे, असं लोक म्हणत आहेत.”
हेही वाचा : पश्चिम बंगालमध्ये नव्याने ४,५१२ करोना रुग्ण आढळल्यानंतर सरकारचा मोठा निर्णय, उद्यापासून शाळा बंद करणार
“बंगालमध्ये कायद्याचं राज्य नाही. इथं केवळ एक शासक शासन करत आहे. संविधानाचं संरक्षण करणं माझी जबाबदारी आहे. माझा कितीही अपमान झाला तरी मी माझ्या कर्तव्यापासून मागे हटणार नाही,” असंही राज्यपाल धनखर एका कार्यक्रमात म्हटले होते.