पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पाच दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीबाबत खुद्द मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी माहिती दिली होती. “आम्ही पंतप्रधानांकडे भेटीची वेळ मागितली होती. हा आमचा सौजन्य दौरा होता. लोकसंख्येनुसार आम्हाल कमी लसी मिळाल्या आहेत. तेव्हा पंतप्रधानांनी यावर लक्ष घालू असं उत्तर दिलं आहे.”, असं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितलं. ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यापूर्वी राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर आणि काँग्रेस नेते कमलनाथ यांच्याशी चर्चा केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या भेटीदरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्याच्या नावाचा प्रश्नही उचलून धरला. तसेच पेगॅसस प्रकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली पाहीजे, असं मतही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केलं. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची चौकशी करायला हवी असंही त्यांनी सांगितलं. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस आणि भाजपात चुरस पाहायला मिळाली होती. मात्र ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने निवडणुकीत घवघवीत यश मिळवत तिसऱ्यांदा सत्ता मिळवली आहे.
It was a courtesy meeting with PM today. During the meeting, I raised the issue of COVID & need for more vaccines & medicines in the state. I also raised the pending issue of the change of name of the state. On this issue, he said, “He will see.”: West Bengal CM Mamata Banerjee pic.twitter.com/XRXc3mmzJa
— ANI (@ANI) July 27, 2021
पेगॅसस हेरगिरी प्रकरणावरून हल्ला चढवताना, मोदी सरकार ‘पाळतशाही’ आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप यापूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला होता. पेगॅसस हेरगिरी प्रकरण समोर आल्यानंतर ही भेट होत झाल्याने राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत. ममता बॅनर्जी यांच्या दिल्ली दौऱ्यातून भाजपा विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न असेल, असंही बोललं जात आहे. या दौऱ्यादरम्यान काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलवलेल्या भाजपा विरोधी पक्षांच्या बैठकीतही सहभागी होण्याची शक्यता आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी ममता बॅनर्जी मोर्चेबांधणी करत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
West Bengal CM Mamata Banerjee met Prime Minister Narendra Modi in Delhi today pic.twitter.com/zRKIGgoLfT
— ANI (@ANI) July 27, 2021
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस अध्यक्षा ममता बॅनर्जी उद्या दिल्लीत पक्ष खासदारांशी चर्चा करणार आहेत. तृणमूल काँग्रेसच्या मुखपत्रातही ‘एबार शपथ, चलो दिल्ली’ याबाबतची घोषणा देण्यात आली आहे. त्यामुळे हा दौरा आणि घोषणेकडे एका नजरेतून बघितलं जात आहे.