पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी २५ जुलैपासून पाच दिवसीय दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी २८ जुलैला दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भेटीसाठी जाणार आहेत. या भेटीबाबत खुद्द मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी माहिती दिली. या भेटीत नेमकी कोणत्या बाबींवर चर्चा होणार?, हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे या भेटीकडे राजकीय जाणकारांचं लक्ष लागून आहे. “मी दोन-तीन दिवस दिल्लीत असणार आहे. यावेळी मी राष्ट्रपतींकडून वेळ मिळाल्यास त्यांच्याशी चर्चा करणार आहे. पंतप्रधानांकडून भेटीची वेळ मिळाली आहे”, असं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं. पश्चिम बंगाल विधानसभा निकालानंतर ही पहिलीच भेट असणार आहे.
पेगॅसस हेरगिरी प्रकरणावरून हल्ला चढवताना, मोदी सरकार ‘पाळतशाही’ आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी केला होता. पेगॅसस हेरगिरी प्रकरण समोर आल्यानंतर ही भेट होत असल्याने राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत. ममता बॅनर्जी यांच्या दिल्ली दौऱ्यातून भाजपा विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न असेल, असंही बोललं जात आहे. या दौऱ्यादरम्यान काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलवलेल्या भाजपा विरोधी पक्षांच्या बैठकीतही सहभागी होण्याची शक्यता आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी ममता बॅनर्जी मोर्चेबांधणी करत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
कुंभमेळा २०२१: बनावट करोना अहवाल प्रकरणी पहिली अटक
तृणमूल काँग्रेसच्या मुखपत्रातही ‘एबार शपथ, चलो दिल्ली’ याबाबतची घोषणा देण्यात आली आहे. त्यामुळे हा दौरा आणि घोषणेकडे एका नजरेतून बघितलं जात आहे.