उद्योगपती गौतम अदानी यांनी गुरुवारी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची राज्य सचिवालय नबान्ना येथे भेट घेतली. बंगालमधील गुंतवणुकीच्या पर्यायांवर दोघांमध्ये चर्चा झाली. पुढील वर्षी एप्रिलमध्ये होणाऱ्या बंगाल ग्लोबल बिझनेस समिटमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती ही अदानी यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही बैठक सुमारे दीड तास चालली. या बैठकीला तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जीही उपस्थित होते. बैठकीत राज्यातील गुंतवणुकीच्या संभाव्य पर्यायांवर चर्चा करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ममता बॅनर्जी दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावरून परतल्यानंतर झालेल्या या बैठकीला महत्त्व आहे कारण बॅनर्जी यांनी राज्य गुंतवणुकीसाठी खुले असल्याचे सांगितले होते. अंबानी आणि अदानीसारखे गुंतवणूकदार बंगालमध्ये यावेत अशी राज्याची इच्छा आहे, असेही त्या म्हणाल्या होत्या. सरकार त्यांच्या पाठीशी उभे राहील आणि त्यांना शक्य ती सर्व मदत करेल असे ममता यांनी स्पष्ट केले.

अदानी यांनी यापूर्वीच पश्चिम बंगाल राज्यात हल्दियामध्ये गुंतवणूक केली आहे आणि राज्यात आणखी गुंतवणूक करण्यात रस दाखवत आहे. बॅनर्जी यांनी यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र यांना बंगाल ग्लोबल बिझनेस समिटचे उद्घाटन करण्यासाठी आमंत्रित केले होते, ज्यासाठी त्यांनी त्यांची प्राथमिक संमती दिल्याची माहिती आहे.

मुंबई दौऱ्यात ममता यांनी शरद पवार, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यासोबतच गीतकार आणि लेखक जावेद अख्तर आणि कलाकार स्वरा भास्कर यांची भेट घेतली. तृणमूल काँग्रेसचे प्रमुख सध्या २०२४च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाविरोधात विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत. तीन दिवस मुंबईत असलेल्या बॅनर्जी यांनी एकाही काँग्रेस नेत्याची भेट घेतली नाही. ममता बॅनर्जी यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता त्यांच्यावर हल्लाबोल केला होता. परदेशात बसून राजकारण करता येत नाही, असे त्या म्हणाल्या होत्या. यासोबतच, आता यूपीए अस्तित्वात नाही असेही ममता म्हणाल्या.

दरम्यान, काँग्रेसला वेगळे ठेवून कोणताही पर्याय देण्याचा प्रयत्न नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले होते. सर्वांना सोबत घेऊन पुढे नेणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. ममता बॅनर्जी यांनी आतापासून बंगाल बिझनेस समिटची तयारी सुरू केली आहे. आपल्या मुंबई दौऱ्यात त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, त्या यंग प्रेसिडेंट्स ऑर्गनायझेशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात येथील व्यावसायिकाला भेटणार आहे. या सर्वांना ती बंगाल समिटसाठी आमंत्रित करणार आहे.