पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सीबीआय आणि ईडीच्या गैरवापरामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी असावेत असं आपल्याला वाटत नसल्याचं म्हटलं आहे. हे काही भाजपा नेत्यांचं काम आहे असा आरोपही त्यांनी केला आहे. सीबीआय, ईडी, आयटी आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणांच्या भूमिकेविरोधात तृणमूल पक्षाने विधानसभेत ठराव मंजूर केला. यावेळी बोलताना ममता बॅनर्जी यांनी हे विधान केलं.

चर्चेदरम्यान ममता बॅनर्जींनी म्हटलं की “मला वाटत नाही पंतप्रधान हे सर्व (केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर) करत आहेत. सीबीआय, ईडी त्यांच्या अंतर्गत येत नाही. हे सर्व गृहमंत्रालयाच्या अधिकाराखाली आहे. हे सर्व भाजपा नेत्यांकडून केलं जात आहे”. यंत्रणांच्या भीतीने उद्योगपती दूर जात असल्याची टीका करताना, ममता बॅनर्जी यांनी भाजपावर हुकूमशाही पद्धतीने कारभार केला जात असल्याचा आरोप केला.

२०२४ च्या निवडणुकीसाठी ममता बॅनर्जी मैदानात, जाहीर केला निर्धार; म्हणाल्या “मी, नितीश कुमार आणि…”

“उद्योजक देश सोडून पळून जात आहेत. ईडी, सीबीआयचा गैरवापर होत असल्याच्या भीतीने ते पळत आहेत. हे सर्व मोदी करत आहेत असं मला वाटत नाही,” असं ममता बॅनर्जींनी म्हटलं. यावेळी भाजपाला लक्ष्य करताना त्या म्हणाल्या “हिटलर, स्टॅलिन, मुसोलिनी सर्वांना त्यांनी (भाजपा) मागे टाकलं आहे. जर या यंत्रणांनी भाजपा नेत्यांच्या घऱांवर धाडी टाकल्या तर खजिना सापडेल”.

“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. केंद्र सरकारचं कामकाज आणि आपल्या पक्षाचं हित या दोन्ही गोष्टी वेगळ्या राहिल्या पाहिजेत याची खात्री पंतप्रधानांनी करायला हवी,” असा सल्ला ममता बॅनर्जींनी यावेळी दिला.

Photos: “…तर मी फार पूर्वीच राजकारण सोडलं असतं”; भाजपा आणि RSS चा उल्लेख करत ममता बॅनर्जींचं मोठं विधान

ममता बॅनर्जींनी यावेळी आपल्या पक्षातून बाहेर पडत भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांच्यावरही जोरदार टीका केली. सुवेंदू अधिकारी यांनी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाई करत असताना आपल्याला हात लावू नका असं म्हटलं होतं. त्याचा उल्लेख करत ममता बॅनर्जींनी ते भाजपामध्ये गेल्यानंतर साधू झालेत असा टोला लगावला. त्यांच्याकडे किती पेट्रोल पंप, फ्लॅट, संपत्ती आहे हे उघड करा अशी मागणीही त्यांनी केली.

Story img Loader