पीटीआय, कोलकाता
पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदु अधिकारी यांनी मुस्लीम आमदारांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी टीका केली. भाजपने राज्यावर बनावट हिंदुत्व आणल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच भाजप अल्पसंख्याकांना देत असलेल्या वागणुकीबद्दल बॅनर्जी यांनी चिंता व्यक्त केली.

पुढील विधानसभा निवडणुकीत भाजप पश्चिम बंगालमध्ये सत्तेत आल्यास विधानसभेतून तृणमूल काँग्रेसच्या सर्व मुस्लीम आमदारांना बाहेर काढले जाईल असे वक्तव्य अधिकारी यांनी मंगळवारी केले होते. त्याला उत्तर देताना, भाजप लोकशाही मूल्ये क्षीण करत असल्याची टीका ममता बॅनर्जी यांनी केली. त्या म्हणाल्या की, ‘‘तुमच्या आयात हिंदू धर्माला वेदांचा किंवा आमच्या साधुसंतांचा पाठिंबा नाही. तुम्ही मुस्लिमांना नागरिक म्हणून असलेले अधिकार कसे काय नाकारू शकता? हे दुसरे तिसरे काही नसून फसवणूक आहे. तुम्ही बनावट हिंदुत्व आणत आहात.’’ राजकीय फायद्यासाठी भाजप धार्मिक भावनांशी खेळ करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीकाही बॅनर्जी यांनी केली. सुवेंदु अधिकारी ३३ टक्के लोकसंख्येला कसे काय नाकारू शकतात असा प्रश्नही त्यांनी विचारला.

मला हिंदू धर्माचे रक्षण करण्याचा अधिकार आहे, पण त्याचे स्वरूप तुमच्या धर्मासारखे नाही. कृपया हिंदू कार्ड खेळू नका.

ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल

भाजपची निदर्शने

भाजपचे हिंदुत्व बनावट असल्याच्या ममता बॅनर्जी यांच्या टीकेचा निषेध करत भाजपच्या आमदारांनी विधानसभेमधून सभात्याग केला. त्यानंतर पक्षाचे मुख्य प्रतोद शंकर घोष यांच्या नेतृत्वाखालील सुमारे २५ भाजप आमदारांनी विधानसभेबाहेर बॅनर्जी यांच्या विरोधात निदर्शने केली. विधिमंडळाच्या अभ्यागत कक्षामध्ये काळ्या कपड्यांतील विशेष पोलीस किंवा तृणमूल काँग्रेसचे गुंड उपस्थित होते असा आरोपही त्यांनी केला.