पश्चिमं बंगालमध्ये १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा सामूहिक बलात्कारानंतर मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलेल्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. ममता बॅनर्जी यांनी मुलीचं प्रेमप्रकरण होतं असा युक्तिवाद केल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. सोमवारी एका कार्यक्रमात बोलताना ममता बॅनर्जी यांनी टीकाकारांना उत्तर देताना शवविच्छेदन होण्याआधीच पीडितेवर अंत्यसंस्कार का करण्यात आले ? तसंच पाच दिवसांनी तक्रार का दाखल करण्यात आली? अशी विचारणा केली. मात्र यानंतर पोलिसांनी कारवाई करत कोणताही राजकीय रंग न पाहता अटक केली असून उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्लीत हे होत नाही असंही सांगितलं.
पीडित तरुणी एका वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेली होती. यावेळी सामूहिक बलात्कार करण्यात आल्यानंतर तिचा मृत्यू झाला असा आरोप कुटुंबाने केला आहे. याप्रकरणी स्थानिक तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या २० वर्षीय मुलाला पोलिसांनी अटक केली आहे.
कुटुंबीय आणि शेजाऱ्यांनी मुलीच्या प्रेमप्रकरणाबद्दल माहिती होतं असा दावा करताना ममता बॅनर्जींनी म्हटलं की, “जर मुलगा आणि मुलगी प्रेमात असतील तर त्यांना थांबवणं माझं काम नाही. हा उत्तर प्रदेश नाही जिथे लव्ह जिहादविरोधात जातात. इथे कुणालाही प्रेम करण्याचं स्वातंत्र्य आहे”. जर गुन्हा झाला असेल तर कारवाई होईल आणि याप्रकरणी कारवाई झाली आहे असंही त्यांनी म्हटलं.
ममता बॅनर्जी यांनी या प्रकरणावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. “तुम्हीच सांगा जर एखाद्याचा मृत्यू ५ तारखेला झाला असेल आणि त्यात काही शंका, तक्रारी असतील तर मग त्याच दिवशी तक्रार दाखल का नाही झाली? तुम्ही पुढे जाऊन मृतदेहावर अंत्यस्कार केले? मी इथे एक सामान्य व्यक्ती म्हणून बोलत आहे, ज्याला काहीच माहिती नाही. पोलिसांना पुरावा कसा मिळणार? तिथे बलात्कार झाला, गर्भवती होती की अजून काही कारण होतं,” अशी विचारणा ममता बॅनर्जींनी केली आहे.
दरम्यान कुटुंबाने तृणमूल काँग्रेसच्या नेत्याने अंत्यसंस्कार करण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला आहे. पोलीस सध्या याप्रकरणी तपास करत असून तक्रार दाखल करण्यास उशीर का झाला याची माहिती घेत आहेत.
ममता बॅनर्जी एवढ्यावरच थांबल्या नाहीत. या घटनेला प्रसिद्धी देत असल्याने त्यांनी मीडियावरही टीका केली. “इथे इतके सण साजरे होतात, पण एकही घटना घडत नाही. पण एक छोटी घटना जरी घडली तरी आम्हाला आवडत नाही. त्यातून किती वाद होतो. पोलिसांना अद्याप माहिती नाही. तुम्ही म्हणताय की, बलात्कारानंतर मुलीचा मृत्यू झाला. तो बलात्कार होता की ती गर्भवती होती की ते प्रेमप्रकरण होतं? तुम्ही चौकशी केली का?”, अशी विचारणा ममता बॅनर्जी यांनी केली.
दरम्यान ममता बॅनर्जींच्या वक्तव्यानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. भाजपाचे सुवेंदू अधिकारी यांनी लोकांनी मुख्यमंत्री निवडण्याच्या आपल्या निर्णयाचा फेरविचार केला पाहिजे असं म्हटलं आहे. “कोणती भाषा त्या वापरत आहेत. या मुख्यमंत्र्यांनी फिनाइल आणि ब्लिचिंग पावडरने तोंड स्वच्छ धुवावे,” असं सुवेंदू अधिकारी म्हणाले आहेत. तसंच जर मुलीच्या कुटुंबाला सीबीआय तपास हवा असेल तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ असंही म्हटलं आहे.