पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात थोडक्यात टळला आहे. मंगळवारी खराब हवामानामुळे सिलिगुडीजवळ सेवोक या एअरबेसवर हेलिकॉप्टरचे तातडीने लँडिंग करण्यात आले. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. जलपाईगुडी येथील निवडणूक रॅलीला संबोधित केल्यानंतर ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरने बैकुंठपूरच्या जंगलावरुन जात होत्या. त्याचवेळी पाऊस आणि खराब हवामानाचा सामना त्यांना करावा लागला. संभाव्य धोका टाळण्यासाठी पायलेटने सेवोक एअरबेसवर हेलिकॉप्टर उतरवलं. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
या घटनेनंतर ममता बॅनर्जी या बागडोगरा विमातळापर्यंत रस्त्याने गेल्या आहेत. तिथून त्या विमानाने कोलकाता या ठिकाणी जाणार आहेत अशीही माहिती मिळाली आहे. पंचायत निवडणुकीसाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी राज्याच्या उत्तर भागांमध्ये दौरा करत आहेत. ८ जुलै रोजी हे पंचायत निवडणुकीसाठी हे मतदान होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणूक होणार आहे ज्यासाठी ममता बॅनर्जी रॅली काढत आहेत. या निवडणुकीच्या अनुषंगाने काही मारहाणीच्याही घटना घडल्याचं समोर आलं आहे.
आज सकाळी कूचबिहार जिल्ह्यात टीएमसीच्या दोन गटांमध्ये हिंसक संघर्ष झाला. यादरम्यान गोळीबारही झाला, ज्यात पाच जण जखमी झाले. तर एकाचा मृत्यू झाला. याआधी सोमवारी मुर्शिदाबादमध्येही टीएमसी आणि सीपीआय कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. यादरम्यान बॉम्बस्फोट झाल्याची घटनाही समोर आली आहे. पंचायत निवडणुकीतील गदारोळ पाहता विरोधकांनी पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय दल तैनात करण्याची मागणी केली आहे.