भारतीय संविधानानुसार कोणत्याही भारतीय नागरिकाला देशात कुठेही मुक्तपणे जाण्याचा अधिकार आहे. मग त्याचं कारण पर्यटन असेल किंवा रोजगार, प्रत्येकाला देशातील कोणत्याही भागात राहता येतं, फिरता येतं. मात्र, २ वर्षांचं मुल असलेल्या पश्चिम बंगालमधील एका जोडप्याला बंगळुरूमध्ये केवळ बांगलादेशी असल्याच्या संशयावरून तब्बल ३०१ दिवस तुरुंगात रहावं लागलं. हे जोडपं रोजगारासाठी पश्चिम बंगालमधून कर्नाटकात स्थलांतरीत झालं होतं. अखेर गुरुवारी (१ जून) न्यायालयाने जामीन मंजूर झाल्यावर त्यांची तुरुंगातून सुटका झाली.
पलाश आणि शुकला अधिकारी रोजगारासाठी आपल्या दोन वर्षांच्या मुलासह जुलै २०२२ मध्ये बंगळुरूमध्ये आले. पोलिसांनी त्यांना बांगलादेशी असल्याच्या संशयावरून अटक केली. या जोडप्याने पोलिसांना आपण बर्धमान जिल्ह्यातील तेलेपूरकूर येथील रहिवासी असल्याचं सांगितलं. मात्र, पोलिसांनी त्यावर विश्वास ठेवला नाही. तसेच दोघांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं.
जामीन मिळूनही जामीनदार नसल्याने महिनाभर तुरुंगात
पलाश आणि शुकलाच्या अटकेबाबत बर्धमानमधील त्यांच्या कुटुंबीयांना समजल्यावर तेही बंगळुरूत आले. त्यांनी वकिलांची मदत घेत जामिनासाठी अर्ज केला. त्यांना न्यायालयाकडून २८ एप्रिलला जामीन मंजूर झाला, मात्र जामीन बाँडसाठी जमिनीचा सातबारा सादर करू शकेल असा स्थानिक जामीनदार न मिळाल्याने त्यांना तुरुंगातच रहावं लागलं. अखेर २४ मे रोजी त्यांची तुरुंगातून सुटका झाली.
बंगळुरू पोलिसांकडून बर्धमानमध्ये जाऊन चौकशी
दरम्यानच्या काळात बंगळुरू पोलिसांच्या एका पथकाने बर्धमानमधील पलाशच्या घरी जाऊन चौकशी केली. तसेच गटविकास अधिकाऱ्यांशी चर्चा करत या जोडप्याची खातरजमाही केली. न्यायालयाच्या जामिनानंतर आता ते आज (२ जून) पश्चिम बंगालमधील आपल्या घरी पोहचतील.