२०११ मधील विधानसभा निवडणुकीत डाव्यांकडून सत्ता खेचून घेतलेल्या ममता बॅनर्जी यांनी सलग दुसऱ्यांदा पश्चिम बंगालवासियांची मते खेचण्यात यश मिळवले असून, तृणमूल काँग्रेसने राज्यात दोन तृतीयांश बहुमत मिळवले आहे. विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीपेक्षा यावेळी तृणमूल काँग्रेसच्या जागांमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. विजयाबद्दल ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालच्या मतदारांचे आभार मानले आहेत. येत्या २७ मे रोजी त्या पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
पश्चिम बंगाल भ्रष्टाचार मुक्त राज्य असल्याचा गर्व- ममता बॅनर्जी
एकूण २९४ जागांच्या पश्चिम बंगाल विधानसभेत तृणमूल काँग्रेसलाच सर्वाधिक जागा मिळतील, अशी शक्यता एक्झिट पोल्सनी वर्तविली होती. ती खरी ठरल्याचे निकालांवरून दिसते. ममता बॅनर्जी यांच्या सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी डाव्या पक्षांसह काँग्रेस, भाजपने मोठे प्रयत्न केले होते. भाजपने ममता बॅनर्जी यांच्यावर प्रचारामध्ये जोरदार टीका केली होती. पण त्याचा काही प्रभाव मतदारांवर पडला नाही. मतदारांनी ममता बॅनर्जी यांनाच पुन्हा निवडून देण्याचे निश्चित केले होते, हे निवडणुकीच्या निकालांवरून स्पष्ट होते आहे.
२०११ मध्ये झालेल्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला १८४ जागांवर यश मिळाले होते. यंदाच्या निवडणुकीत २९४ पैकी २०० हून अधिक जागांवर या पक्षाचे उमेदवार विजयी होताना दिसत आहेत. दुपारी एक वाजेपर्यंत २१४ जागांवर तृणमूल काँग्रेसचे उमेदवार विजयी आघाडीवर होते. खुद्द ममता बॅनर्जी यांनी भाबनीपूर मतदारसंघातून त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी भाजपचे चंद्र बोस यांच्यावर मोठी आघाडी मिळवली आहे.
Kolkata: Celebrations outside Mamata Banerjee’s residence after early trends show her leading by over 3000 votes pic.twitter.com/302uF0Y5cu
— ANI (@ANI_news) May 19, 2016