पश्चिम बंगालमधल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत असतानाच आता अजून एक बातमी समोर येत आहे. पश्चिम बंगालमधल्या आरामबाग इथं असलेल्या भाजपाच्या कार्यालयाला आग लागल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात तृणमूल काँग्रेसवर आरोप करण्यात आले आहेत. त्यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत.

टीव्ही ९ च्या पत्रकाराने इथल्या आगीचा व्हिडिओ ट्विट केला आहे. त्याचबरोबर भाजपाचे प्रवक्ता संबित पात्रा यांनीही हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यासोबतच्या आपल्या ट्विटमध्ये त्यांनी तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी ही आग लावली असल्याचे आरोप केले आहेत. त्याचसोबत या कृत्याचा निषेधही केला आहे.

तर अभिनेत्री कंगना रणौतनेही हा व्हिडिओ शेअर केला आहे. आपल्या ट्विटमध्ये ती म्हणते, बंगालमध्ये इथून पुढे होणाऱ्या रक्तपाताकडे दुर्लक्ष करणं अवघड होणाऱ आहे. आत्तापर्यंत अनेकांना मारलंय..आता हारण्याच्या भीतीने त्यांना रक्ताची अजून तहान लागणार आहे.

दरम्यान, तृणमूल काँग्रेसकडून ह्या आगीसंदर्भातले आरोप फेटाळले जात आहेत.

संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. तृणमूल काँग्रेसने २०० हून अधिक जागा मिळवत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. तर दुसरीकडे कडवं आव्हान देत जोरदार प्रचार केलेल्या भाजपाच्या हाती मोठी निराशा आली आहे. भाजपाची शंभरी पूर्ण करतानाही दमछाक झाली आहे. अद्याप निवडणुकीच्या अधिकृत निकालाची घोषणा झालेली नाही, मात्र ममता बॅनर्जी यांनी विजयाची हॅटट्रिक साधल्याचं चित्र स्पष्ट आहे.

दरम्यान ममता बॅनर्जी यांनी अखेर नंदीग्राम मतदारसंघातून विजय मिळवला आहे. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये पिछाडीवर असल्याने ममता बॅनर्जींचा पराभव होण्याची शंका निर्माण झाली होती. पण नंतर ममता बॅनर्जी यांनी जोरदार मुसंडी मारली आणि भाजपाचे सुवेंदू अधिकारी यांचा १२०० मतांनी पराभव केला.

Story img Loader