West Bengal Governor Called Mamata Banerjee as Lady Macbeth: कोलकातील आर. जी. कर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बलात्कार व हत्या प्रकरणावर सध्या देशभरात संतप्त भावना व्यक्त होत आहेत. या प्रकरणामुळे पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारसमोरही पेच निर्माण झाला आहे. प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर शासकीय रुग्णालयात बलात्कार व हत्या होण्यासारखा प्रसंग घडणं संतापजनक असल्याचं म्हणत डॉक्टरांनी कामबंद आंदोलन सुरू केलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालचे राज्यपाल आनंद बोस यांनी ममता बॅनर्जींवर परखड शब्दांत टीका केली आहे. तसेच, त्यांना लेडी मॅकबेथचीही उपमा दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय घडतंय पश्चिम बंगालमध्ये?

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी आंदोलक डॉक्टरांशी चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली होती. त्यासाठी खुद्द मुख्यमंत्री बैठकीच्या हॉलमध्ये उपस्थित होत्या. जवळपास तासभर त्या तिथेच बसून राहिल्या. पण आंदोलक बैठकीसाठी आलेच नाहीत. त्यामुळे आंदोलकांशी चर्चेचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न निष्फळ ठरला. यावर ममता बॅनर्जी यांनीही उद्विग्न प्रतिक्रिया दिली.

ममता बॅनर्जींनी पाहिली दोन तास वाट, पण आंदोलक आलेच नाहीत (फोटो – @AITCofficial)

” मी ज्युनियर डॉक्टरांबरोबर चर्चा करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मी तीन दिवस त्यांची वाट पाहिली. त्यांनी एकदा यावं आणि त्यांच्या समस्या सांगाव्या. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय नाकारला आहे. मला या सगळ्याचं वाईट वाटतंय. मी देश आणि राज्यातील लोकांची माफी मागते. ज्यांना वाटतंय त्यांनी या आंदोलनाचं समर्थन करावं, माझी काहीच हरकत नाही. मला वाटतं की सामान्य नागरिकांना न्याय मिळावा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार डॉक्टरांनी आता त्यांच्या कर्तव्यावर परत जायला हवं”, असं त्या म्हणाल्या. तसेच, या प्रकरणात त्यांनी लोकहितासाठी राजीनामा देण्यासही तयार असल्याचं नमूद केलं.

Mamata Banerjee : ममता बॅनर्जी आल्या, दोन तास थांबल्या, पण कोणीही आले नाही; कोलकाता बलात्कार प्रकरणी आंदोलकांची आजची बैठकही निष्फळ!

राज्यपालांची आगपाखड

पश्चिम बंगालमध्ये राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री असा राजकीय कलगीतुरा गेल्या अनेक महिन्यांपासून चालू आहे. कोलकाता बलात्कार व हत्या प्रकरणाच्या निमित्ताने त्याचाच पुढचा अध्याय पाहायला मिळाला. राज्यपाल आनंद बोस यांनी ममता बॅनर्जी परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याचं सांगत त्यांच्यावर हल्लाबोल केला.

“ममता बॅनर्जी सरकार त्यांचं कर्तव्य निभावण्यात अपयशी ठरलं आहे. लोकांच्या भावना समजून घेण्यात त्यांना अपयश आलं आहे. ममता बॅनर्जी या तर बंगालच्या ‘लेडी मॅकबेथ’ आहेत. राज्यात, घरात, परिसरात, रुग्णालयांत, शहरांत हिंसाचार पसरला आहे. शांत बहुसंख्य हे लोकशाहीचा भाग असतात, पण बहुसंख्यांबाबत मौन हे लोकशाहीत अभिप्रेत नाही. पश्चिम बंगालच्या लोकांप्रतीच्या सहवेदना म्हणून मी मुख्यमंत्र्यांवर सामाजिक बहिष्कार घालतो”, असं राज्यपाल म्हणाले.

कोण आहे लेडी मॅकबेथ?

लेडी मॅकबेथ हे सुप्रसिद्ध साहित्यिक विल्यम्स शेक्सपियरच्या मॅकबेथ या अजरामर नाटकातील प्रमुख पात्र आहे. नाटकातील नायकाचं नाव मॅकबेथ असून त्याच्या पत्नीला लेडी मॅकबेथ असं म्हटलं जातं. लेडी मॅकबेथनं तिच्या पतीवर अनेक गुन्हेगारी कृत्य करण्यासाठी दबाव आणला. तसेच, या नाटकात लेडी मॅकबेथचं पात्र क्रूर आणि निष्ठुर स्वरुपाचं दर्शवण्यात आलं आहे.

“मी कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा कार्यक्रमात ममता बॅनर्जींबरोबर सहभागी होणार नाही. ज्या कार्यक्रमाशी ममता बॅनर्जी संबंधित असतील, अशा कार्यक्रमातही मी जाणार नाही”, असं ते म्हणाले.

Mamata Banerjee: “मला खुर्ची नको, राजीनामा द्यायला तयार”, आंदोलक डॉक्टरांनी चर्चेस नकार दिल्यानंतर ममता बॅनर्जींचं वक्तव्य

“राज्यातील सध्याच्या स्थितीबाबत मला लोकांकडून खूप प्रश्न विचारले जातात. मी राज्यघटनेशी बांधील आहे. मी बंगालच्या लोकांशी बांधील आहे. मी आर. जी. कर रुग्णालय घटनेतील पीडितेच्या कुटुंबीयांशी आणि तिच्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांशी बांधील आहे. माझ्यामते लोकांच्या व समाजाच्या भावना समजून घेण्यात पश्चिम बंगालचं सरकार अपयशी ठरलं आहे”, असं ते म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: West bengal governor ananda bose slams mamata banerjee as lady macbeth of bengal in r g kar hospital rape murder case pmw