टीम इंडियानं रविवारी द. आफ्रिकेला पराभवाची धूळ चारत यंदाच्या विश्वचषकातला आपला सलग आठवा विजय साजरा केला. त्यात विराट कोहलीच्या ४९व्या शतकामुळे झालेल्या आनंदाची भर पडली! एकीकडे टीम इंडिया त्यांच्या मेहनतीला आलेलं फळ साजरं करण्यात व्यग्र असताना दुसरीकडे या विजयावर देश-विदेशातून प्रतिक्रिया उमटत होत्या. इतर सर्वच क्षेत्रांप्रमाणे राजकीय वर्तुळातूनही त्यावर काही प्रतिक्रिया आल्या आहेत. पश्चिम बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंदा बोस यांनी भारतीय संघाचं अभिनंदन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेचं कोतुक केलं आहे!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय संघानं रविवारी गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या द. आफ्रिका संघावर दणदणीत विजय मिळवला. आधी फलंदाजी करताना टीम इंडियानं ३२६ धावांचा डोंगर उभा केला. ईडन गार्डन्सवर आफ्रिकेचे खेळाडू फलंदाजीसाठी उतरले, तेव्हा मात्र भारतीय गोलंदाजांच्या तिखट माऱ्यासमोर त्यांची भंबेरी उडाली आणि आफ्रिकेचा आख्खा संघ अवघ्या ८७ धावांमध्ये माघारी परतला! या विजयात विराट कोहलीच्या शतकाचा सिंहाचा वाटा होता.

स्क्रीनवर पाहिला राज्यपालांनी सामना!

दरम्यान, प. बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंदा बोस यांनी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याच्या तिकिटांचा काळा बाजार झाल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांना देण्यात आलेली तिकिटं परत केली व राजभवनातच मोठी स्क्रीन लावून सामना पाहणं पसंत केलं. यावेळी त्यांच्यासमवेत त्यांचा कर्मचारी वर्ग व इतर उच्चपदस्थ अधिकारीही होते. विजयानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना सी. व्ही. आनंदा बोस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेचा उल्लेख केला.

काय म्हणाले आनंदा बोस?

भारतीय संघाचं कौतुक करताना राज्यपाल म्हणाले, “ही आपल्या सगळ्यांसाठीच गौरवाची बाब आहे. भारतानं पुन्हा एकदा आपणच अव्वल असल्याचं सिद्ध केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची आत्मनिर्भर भारत या संकल्पनेचा आता इतर क्षेत्रांप्रमाणेच क्रीडा क्षेत्रातही प्रसार होत आहे. आपण संपूर्ण जगाला हे सिद्ध करून दाखवलं आहे की आपण आत्मनिर्भर आहोत”, असं बोस यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटलं.

BCCI चे मानले आभार!

दरम्यान, बोस यांनी यावेळी बीसीसीआयचेही आभार मानले. “भारत सक्षम आहे. आपण जगाला हे दाखवून दिलंय की भारत सक्षम आहे. हे सगळं घडवून आणण्यासाठी आम्ही बीसीसीआयचे आभार मानतो. हा देशातील सर्व लोकांचा विजय आहे, हा महान पश्चिम बंगालमधील सर्व नागरिकांचा विजय आहे”, असंही बोस यांनी नमूद केलं.

“मी विराटचं अभिनंदन का करू?” कुसल मेंडिसच्या प्रश्नावर भडकले नेटिझन्स; म्हणे, म्हणूनच श्रीलंका…

दरम्यान, राज्यपालांच्या या विधानावर तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार साकेत गोखले यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. “विराट कोहलीचं भन्नाट शतक आणि भारतीय संघाच्या विजयाचं श्रेय मोदींना? हे तर पश्चिम बंगालच्या राज्यपालांसाठीही आणखी खालच्या स्तराचं आहे. भाजपा आपला अजेंडा राबवण्यासाठी अशा लोकांना राज्यपालपदी नियुक्त करते आणि हे लोकही त्यांच्या वरिष्ठांना खूश करण्यासाठी काहीही बोलतात”, असं साकेत गोखले यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, राज्यपाल सी. व्ही. आनंदा बोस यांच्या विधानावर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: West bengal governor c v ananda bose praised pm narendra modi on india win against south africa in world cup 2023 match pmw
Show comments