पश्चिम बंगालच्या दक्षिणेकडील जिल्ह्य़ांना शनिवारी मुसळधार पावसाने तडाखा दिला. राजधानी कोलकात्यात सकाळपासूनच शहरातील बहुतांश भाग पाण्याखाली गेल्याने रस्ते व रेल्वे वाहतूक कोलमडून पडल्यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले.
शनिवारी सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या २४ तासात हवामान खात्याने १३३.६ मिलीमीटर पावसाची नोंद केली असून, गांगेय पश्चिम बंगालमध्ये उद्यापर्यंत अतिशय जोरदार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे.
दक्षिण बंगालमधील हावडा, दक्षिण २४ परगणा व पूर्व मिदनापूर यासारख्या जिल्ह्य़ांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. वादळी हवामानामुळे ३९ बळी गेले असून अनेक जण बेघर होण्यासह ७ लाख लोकांना याचा फटका बसल्याचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काल सांगितले होते. सततच्या पावसामुळे उत्तर व दक्षिण कोलकात्यातील अनेक रस्ते गुडघाभर पाण्याखाली आहेत. अनेक प्रमुख भागांमध्ये पाणी साचल्यामुळे रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. हावडा जिल्ह्य़ातील पांचला भागात जोरदार पावसामुळे मातीचे घर कोसळून एक महिला ठार झाली. शुक्रवारी पौर्णिमा आणि सोबत मुसळधार पाऊस यामुळे गंगा नदीच्या पातळीत ६.८ मीटर इतकी वाढ झाली. यामुळे पाणलोट क्षेत्रातून काही पाणी सोडावे लागले. रेल्वेचे रूळ पाण्याखाली गेल्यामुळे पूर्व रेल्वेवरील हावडा व सियाल्दा स्थानकांवरील रेल्वे सेवांवर परिणाम झाला असून, या दोन्ही स्थानकांवरून सुटणाऱ्या व तेथे पोहचणाऱ्या गाडय़ा उशिरा धावत आहेत, असे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले. हजारदुराई लालगोला एक्स्प्रेस वगळता कोलकाता स्थानकापासूनच्या तसेच तेथे पोहचणाऱ्या सर्व गाडय़ा सियाल्दा येथे वळवण्यात आल्या आहेत.

Story img Loader