Murshidabad Communal Violence : पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये शुक्रवारी (११ एप्रिल) वक्फ सुधारणा कायद्याविरोधात (Waqf Amendment Act) हिंसक आंदोलन पाहायला मिळालं. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेकही केली. तसेच परिसरातील अनेक वाहने पेटवली. हिंसक आंदोलकांनी बराच वेळ अनेक रस्त्यांवरील वाहतूक रोखून धरली होती. तसेच रेल्वे गाड्या देखील थांबवल्या होत्या. स्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांच्या एका तुकडीला पाचारण करण्यात आलं होतं. मात्र, आंदोलकांनी त्यांच्यावर दगडफेक केली. यामध्ये १० पोलीस जखमी झाले आहेत. पोलिसांनी या घटनेची माहिती देताना सांगितलं की आता स्थिती नियंत्रणात आहे.
बंगाल पोलिसांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर यासंबधी एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “सुती आणि शमशेरगंजमधील स्थिती आता पूर्ववत झाली आहे. पोलिसांनी जमाव पांगवला आहे आणि राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू केली आहे. रस्ते वाहतूक सुरळीत झाली आहे. तसेच रेल्वे वाहतूक देखील पूर्ववत झाली आहे. मुर्शिदाबादमध्ये हिंसक आंदोलन करणारे, जाळपोळ करणाऱ्यांवर कठोर कावाई केली जाईल.”
दंगेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांकडून छापेमारी
पश्चिम बंगाल पोलिसांनी म्हटलं आहे की दंगलखोरांना पकडण्यासाठी एका पोलीस पथकाने शोधमोहीम हाती घेतली आहे. पोलिसांकडून मुर्शिदाबादमध्ये छापेमारी चालू आहे. ज्या-ज्या भागात हिंसक आंदोलनं झाली तिथलं सीसीटीव्ही फूटेज तपासून आरोपींचा शोध घेतला जात आहे. त्याचबरोबर अफवा पसरवणाऱ्यांवरही कारवाई केली जाईल. पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. तसेच कुठल्याही प्रकारच्या अफवेकडे लक्ष देऊ नका असंही म्हटलं आहे.
मुर्शिदाबादमध्ये नेमकं काय घडलं?
एका पोलीस अधिकाऱ्याने पीटीआयला या घटनेची माहिती दिली. ते म्हणाले, “शुक्रवारच्या नमाज पठणानंतर काही लोक शमशेरगंजमधील चौकांमध्ये जमले. त्यांनी वक्फ कायद्याविरोधात आंदोलन सुरू केलं. त्यांनी राष्ट्रीय महामार्ग-१२ बंद केला. त्याचदरम्यान बंदोबस्तासाठी पोलिसांची एक कार तिथे आली. मात्र, आंदोलकांपैकी काही लोकांनी पोलिसांच्या कारवर दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांनी दगडफेक करणाऱ्यांना रोखण्यासाठी त्यांच्या दिशेने धाव घेतली. यावेळी पोलीस व आंदोलकांमध्ये झडप झाली.”
दुसऱ्या बाजूला, मालदा येथे आंदोलकांनी रेल्वेच्या रुळावर बसून आंदोलन केलं. त्यामुळे रेल्वेची वाहतूक प्रभावित झाली होती. मात्र, आता आंदोलकांनी तिथून माघार घेतली असून रेल्वे सेवा सुरळीत झाली आहे.