विधानसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये घरवापसीचे वारे वाहताना दिसत आहे. निवडणुकीपूर्वी भाजपात दाखल झालेले काही आमदार आणि नेते पुन्हा तृणमूल काँग्रेसचं दार ठोठावू लागले आहेत. शुक्रवारी भाजपाचे नेते मुकुल रॉय यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानं भाजपाला मोठा झटका बसला आहे. इतकंच नाही, तर भाजपाला मोठे हादरे बसण्याची शक्यता आहे. भाजपाचे बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी बोलवलेल्या बैठकीकडे एका खासदारासह तीन आमदारांनी पाठ फिरवली. त्यामुळे चार जण तृणमूलच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्या. तृणमूल पुन्हा सत्तेत आल्याने निवडणुकीपूर्वी भाजपात गेलेले नेते परतीची पावलं टाकताना दिसत आहे. पूर्वाश्रमीचे तृणमूलचे नेते मुकुल रॉय हे भाजपा गेले होते. चार वर्षांनंतर त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत पुन्हा ममतांच्या उपस्थितीत तृणमूलमध्ये प्रवेश केला. हा भाजपाला मोठा मानला जात आहे.
हेही वाचा- “भाजपामधून आणखी लोक येणार, मात्र…. ”; ममता बॅनर्जींचं मोठं विधान
दरम्यान, पश्चिम बंगाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी पक्षाची बैठक बोलावली होती. या बैठकीला एका खासदारासह तीन आमदारांनी दांडी मारली. त्यामुळे हे चौघे भाजपा सोडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चेला दुजोरा मिळत असल्याचं म्हटलं जात आहे. भाजपाचे खासदार शांतनु ठाकूर आणि अन्य तीन आमदार शुक्रवारी दिलीष घोष यांनी बोलावलेल्या बैठकीला गैरहजर होते. मुकुल रॉय यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला, त्याच दिवशी हे घडलं.
हेही वाचा- भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये!
सीएए कायदा लागू करण्यावरून खासदार शांतनु ठाकूर भाजपावर नाराज असल्याचं समोर आलं होतं. बंगालच्या राजकारणात महत्त्वाच्या असलेल्या मतुआ समुदायातून ठाकूर येतात. तर विश्वजित दास, अशोक कीर्तनिया आणि सुब्रत ठाकूर हे तीन आमदार बैठकीला गैरहजर राहिल्याने त्यांच्याबद्दलही चर्चा होत आहे. निवडणुकीचे निकाल लागल्यापासून भाजपातील कार्यकर्ते मुंबईत दाखल होत आहे. त्यामुळे भाजपाची चिंता वाढण्याची शक्यता आहे.