पीटीआय, कोलकाता/ चेन्नई/ रांची : पश्चिम बंगाल, तमिळनाडू व झारखंडमध्ये तीन जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत दोन ठिकाणी काँग्रेस, तर झारखंडमधील एका जागी भाजपच्या पाठिंब्यावर एजेएसयू पक्षाचा उमेदवार विजयी झाला. पश्चिम बंगालमधील सागरदिघी मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे बायरन बिस्वास यांनी विजय मिळवला. या विजयामुळे पश्चिम बंगालच्या आताच्या विधानसभेत प्रथमच काँग्रेसला जागा मिळाली. बिस्वास यांनी तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराचा २२,९८६ मतांनी पराभव केला.

बिस्वास यांना डाव्या पक्षांनी पाठिंबा दिला होता. त्यांच्या पारडय़ात ८७,६६७ मते मिळाली, तर तृणमूलाच्या देबाशिष बॅनर्जी यांना ६४,६८१ मते मिळाली. भाजपच्या दिलीप साहा यांना २५,८१५ मते मिळाली. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये या मतदारसंघातील आमदार आणि राज्यमंत्री सुब्रत साहा यांचे निधन झाल्याने येथे पोटनिवडणूक घेण्यात आली. २०२१च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती. स्वातंत्र्यानंतर प्रथमच पश्चिम बंगाल विधानसभेत काँग्रेसला खाते उघडण्यात अपयश आले होते.

तामिळनाडूत काँग्रेसचा विजय

तामिळनाडूतील इरोड पूर्व मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत द्रमुकच्या नेतृत्वाखालील धर्मनिरपेक्ष पुरोगामी आघाडीने (एसपीए) विजय मिळवला. एसपीएने या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार इलानगोवन यांना तिकीट दिले होते. इलानगोवन यांनी अण्णा द्रमुकच्या उमेदवाराचा ६६ हजारांनी पराभव केला. त्यांनी अण्णा द्रमुकच्या थेन्नारसू यांना ४४,००० मतांनी पराभव केला. काँग्रेसचे आमदार तिरुमाहन एवेरा यांच्या निधनामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली.

झारखंडमध्ये ‘एजेएसयू’ उमेदवार विजयी

झारखंड विधानसभेच्या रामगढ मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत ‘ऑल झारखंड स्टुडंट युनियन’ (एजेएसयू) पक्षाच्या उमेदवार सुनिता चौधरी यांचा विजय झाला. भाजपने पाठिंबा दिलेल्या चौधरी यांनी २१,९७० मतांनी काँग्रेसचे उमेदवार बजरंग महातो यांचा पराभव केला. काँग्रेसच्या आमदार ममता देवी यांना एका फौजदारी खटल्यात शिक्षा झाल्याने या मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली.

Story img Loader