पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. येथे तृणमूल काँग्रेसने लोकसभेच्या सर्व ४२ जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून इंडिया आघाडी म्हणून काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात जागावाटपावर चर्चा चालू होती. मात्र तृणमूलने आता सर्व ४२ जागांवर आपले उमेदवार जाहीर केल्यामुळे येथे इंडिया आघाडी संपुष्टात आली आहे. तृणमूलने यावेळी बड्या नेत्यांना उमेदवारी दिली आहे.
महुआ मोईत्रा यांना उमेदवारी
तृणमूल काँग्रेसने नुकतेच लोकसभा निवडणुकीसाठी पश्चिम बंगालमधील सर्व ४८ जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांना ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा तिकीट दिले आहे.संसदेत प्रश्न विचारण्यासाठी मोईत्रा यांनी पैसे घेतल्याचा आरोप भाजपाने केला होता. त्यानंतर देशभरातून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. त्यांची खासदारकी रद्द करण्याचाही निर्णय घेण्यात आला होता. या आरोपांनंतर तृणमूल काँग्रेस मोईत्रा यांना पुन्हा एकदा तिकीट देणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र पक्षाने मोईत्रा यांच्यावर विश्वास ठेवला असून त्या कृष्णानगर येथून लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत.
युसुफ पठाण, अभिषेक बॅनर्जी यांना तिकीट
तृणमूल काँग्रेसने यावेळी क्रिकेटपटू युसुफ पठाण यांनादेखील लोकसभा निवडणुकीचे तिकीट दिले आहे. ते बहरामपूर येथून निवडणूक लढवतील. तृणमूलने सुगता रॉय यांनादेखील डम-डम या जागेवरून तिकीट दिले आहे. तृणमूल काँग्रेसचे द्वितीय क्रमांकाचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनादेखील उमेदवारी देण्यात आली असून ते त्यांच्या डायमंड हार्बर या मतदारसंघातून निवडणूक लढवतील.
पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडी संपुष्टात?
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून इंडिया आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात जागावाटपावर चर्चा चालू होती. काँग्रेस पक्षाला तृणमूल पक्ष अवघ्या दोन जागा देण्यास तयार होता. तर काँग्रेसला आणखी जागा हव्या होत्या. जागावाटपावर कोणताही ठोस तोडगा निघत नसल्यामुळे ममता बॅनर्जी यांनी काही दिवसांपूर्वी आम्ही लोकसभेची निवडणूक स्वबळावर लढवणार आहोत, अशी घोषणा केली होती. तसेच आमची इंडिया आघाडीशी जागावाटपासंदर्भात कोणतीही चर्चा चालू नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र त्यानंतर संयमाची भूमिका घेत काँग्रेसने तृणमूल काँग्रेसशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला होता. या चर्चेतून कोणताही ठोस निष्कर्ष निघत नसल्यामुळे आता शेवटी तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालच्या सर्व ४२ जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे आता पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडी संपुष्टात आल्याचे म्हटले जात आहे.