West Bengal : पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील मोथाबारी परिसरात दोन समुदायांमध्ये हिंसाचार झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत अनेक दुकाने आणि घरांची तोडफोड करण्यात आली. तसेच काही घरांना आणि दुकानांना आग लावण्यात आली. या घटनेमुळे मोथाबारी परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. या हिंसाचारानंतर तब्बल ३४ जणांना अटक करण्यात आली आहे.

तसेच इंटरनेट सेवा तात्पुरती बंद करण्यात आली असून प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. मोथाबारी परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. दरम्यान सध्या येथील परिस्थिती नियंत्रणात असून परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहिती मालदाचे जिल्हा दंडाधिकारी नितीन सिंघानिया यांनी सांगितलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे.

या घटनेबाबत पोलिसांनी सांगितलं की, “बुधवारी एक रॅली निघाली होती, ही रॅली स्थानिक परिसरात असेल्या एका मशिदीजवळून गेली. यावेळी काही लोकांनी मशिदीजवळ फटाके फेकल्याचा आरोप करण्यात आला. यानंतर काही लोकांनी आंदोलने केली. यावेळी अचानक पोलिसांवर दगडफेक करत वाहनाची तोडफोड करण्यात आली. यानंतर जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज करत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. यावेळी जमावाने परिसरातील सार्वजनिक वाहने आणि दुकानांची तोडफोड केली.

दरम्यान, मालदा जिल्हा पोलिसांनी माहिती देताना सांगितलं की, “आतापर्यंत तक्रारींच्या आधारे ६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच आतापर्यंत या प्रकरणात तब्बल ३४ जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच पुन्हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी पोलीस लक्ष ठेवून आहेत. तसेच पेट्रोलिंग मोबाईल युनिट्स सक्रिय आहेत. तसेच आम्ही सर्व नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन करत आहोत. तसेच कोणत्याही अफवांना बळी पडू नये”, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

काँग्रेसची प्रतिक्रिया काय?

मालदा जिल्ह्यातील मोथाबारी परिसरात दोन समुदायांमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेवर तृणमूल काँग्रेसच्या आमदार सबिना यास्मिन यांनी द इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधताना म्हटलं की, “सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. प्रशासनाने शांतता समितीची बैठक बोलावली आहे. त्या ठिकाणी दोन्ही समुदायांचे लोक उपस्थित राहतील. आम्ही सर्वांना शांततेचे आवाहन करत आहोत. लोकांना सोशल मीडियावरील अफवांकडे लक्ष न देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे”, असं आमदार सबिना यास्मिन यांनी म्हटलं आहे.

भाजपाची प्रतिक्रिया काय?

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सुकांता मजुमदार यांनी दावा केला आहे की, “त्यांच्या पक्षाच्या एका शिष्टमंडळाला शुक्रवारी मोथाबारी परिसरात प्रवेश करण्यास परवानगी देण्यात आली नाही. कालपासून मालदा येथील मोथाबारी येथे परिस्थिती तणावपूर्ण आहे. हिंदू मंदिरे आणि घरांची तोडफोड करण्यात आली आहे. राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांच्याशी आम्ही बोललो आहोत. तसेच गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला आहे. आता परिस्थिती नियंत्रणात आवी असली तरी बंगालमध्ये अशा घटना वारंवार का घडत आहेत हा प्रश्न आहे”, असं सुकांता मुजुमदार यांनी म्हटलं आहे.