कोलकाता : पश्चिम बंगालमधील ‘सिलगुडी सफारी पार्क’मधील सिंहाच्या नावावरून वाद झाला आहे. ‘अकबर’ नावाच्या नर सिंहासह ‘सीता’ नावाच्या मादी सिंहाला ठेवण्यात आल्याने विश्व हिंदू परिषदेने कोलकत्ता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. वन विभागाच्या या कृत्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.
सिलगुडीमधील ‘उत्तर बंगाल वन्यपशू उद्यान’ (सिलगुडी सफारी पार्क) या नावाच्या प्राणीसंग्रहालयात ही सिंहाची जोडी आहे. नर सिंहाचे नाव अकबर आणि मादी सिंहाचे नाव सीता असल्याने विश्व हिंदू परिषदेच्या बंगाल शाखेने त्यास आक्षेप घेतला आहे. कलकत्ता उच्च न्यायालयाच्या जलपाईगुडी खंडपीठामध्ये १६ फेब्रुवारी रोजी याचिका दाखल करण्यात आली असून २० फेब्रुवारी रोजी त्यावर सुनावणी होणार आहे. ‘‘मादी सिंहाला सीतेचे नाव देण्यात आले आहे. सीता ही जगभरातील हिंदूंसाठी पवित्र देवता आहे. असे कृत्य ईशिनदा असून हिंदूंच्या धार्मिक श्रद्धेवर थेट हल्ला आहे,’’ असा संताप विश्व हिंदू परिषदेने या याचिकेद्वारे व्यक्त केला आहे. या मादी सिंहाचे नाव ‘श्रुती’ असे आहे. मात्र ते नंतर बदलण्यात आले, असे या याचिकेत म्हटले आहे.
हेही वाचा >>> “इंदिरा गांधींचा तिसरा मुलगा काँग्रेस सोडणार?”, कमलनाथांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चेवर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
‘उत्तर बंग संवाद’ या वृत्तपत्रात ‘संगीर खोजे अस्थिर सीता’ (सीता जोडीदारच्या शोधात अस्वस्थ) या शीर्षकाखाली बातमी प्रसिद्ध करण्यात आली. या बातमीमध्ये नर सिंहाला ‘अकबर’ असे नाव देण्यात आले, असे म्हटल होते. अत्यंत आक्षेपार्ह व असभ्य पद्धतीने ही बातमी देण्यात आली होती, ज्यामुळे देशभरातील हिंदूच्या भावना दुखावल्या आहे, असे या याचिकेत म्हटले आहे.
सिलगुडीमधील प्राणिसंग्रहालयात ही सिंहाची जोडी आहे. नर सिंहाचे नाव अकबर आणि मादी सिंहाचे नाव सीता असल्याने विश्व हिंदू परिषदेच्या बंगाल शाखेने त्यास आक्षेप घेतला आहे.
नाव बदलण्याची विनंती
सिलगुडी सफारी पार्कमधील मादी सिंहाचे ‘सीता’ हे नाव बदलण्यात यावे, असे याचिकेद्वारे सांगण्यात आले आहे. या प्राण्याचे नाव बदलण्यासाठी त्वरित पावले उचलावी आणि हिंदू धर्माशी संबंध नसलेले कोणतेही सामान्य नाव देण्यात यावे, असे याचिकेत म्हटले आहे.
वन विभागाचे म्हणणे..
सिंहाच्या या जोडीला काही दिवसांपूर्वी त्रिपुरातील सेपाहिजाला प्राणिसंग्रहालयातून आणण्यात आले होते, असे पश्चिम बंगाल वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सिलगुडी सफारी पार्कमध्ये येण्यापूर्वीच या दोन्ही सिंहाची नावे ठेवण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्या नावात बदल करण्यात आला नाही, असे वन विभागाने सांगितले.