युरोपमधील काही भागांमध्ये आलेलेल्या पुरामध्ये संपूर्ण गावचं गावं वाहून गेली आहे. या पुरामध्ये आतापर्यंत १५३ जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी १३३ जण हे पश्चिम जर्मनीतील आहे. पूरग्रस्त भागांमध्ये मदतकार्य वेगाने सुरू असून बेपत्ता झालेल्या अन्य शेकडो जणांचा कसून शोध घेतला जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय. जर्मनीमधील बिल्ड या वृत्तपत्राने अचानक आलेल्या या पुराला मृत्यूचा पूर असं म्हटलं आहे. अचानक आलेल्या या पुरामुळे स्थानिकांना सुरक्षितस्थळी जाण्याचाही वेळ मिळाला नाही. बेल्जियमच्या काही भागांनाही या पुराचा फटका बसलाय.

अनेक भागांमध्ये रस्ते आणि घरं पाण्याखाली गेली आहेत. तर गाड्याही वाहून गेल्या आहेत. काही जिल्ह्यांचा संपर्क पूर्णपणे तुटलाय. “अवघ्या १५ मिनिटांमध्ये सारं काही पाण्याखाली गेलं,” असं येथील एका २१ वर्षीय अ‍ॅगरॉन बेर्शिचा याने एफपीशी बोलताना सांगितलं. डेकोरेटर असणाऱ्या अ‍ॅगरॉनने, “आमचं ऑफिस, घर, शेजाऱ्यांचं घर सगळीकडे पाणीच पाणी आहे,” असंही सांगितलं. अनेक ठिकाणी गाड्या वाहून गेल्या असून झाडंही उन्मळून पडली आहेत. आम्ही मागील २० वर्षांपासून येथे राहत आहोत. मात्र यापूर्वी निर्सगाचा असा प्रकोप कधीही पाहिला नाही. हे एखाद्या युद्धभूमीमध्ये असल्यासारखं आहे, असं येथील स्थानिकांनी म्हटलं आहे.

नक्की पाहा >> खेळण्यातील गाड्यांसारख्या वाहून गेलेल्या गाड्या अन् उद्धवस्त घरं… जर्मनीमधील पुराचे फोटो पाहून अंगावर काटा येईल

ऱ्हाइनलॅण्ड-पॅलटिनेटचे इंटीरीयर मिनिस्टर असणाऱ्या रॉजर लिवेत्झ यांनी मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केलीय. मदतकार्य पोहचवणाऱ्या टीम अद्याप प्रभावित प्रदेशामध्ये पूर्णपणे पोहचलेल्या नाही. त्यामुळे मृतांचा आकडा अधिक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुसळधार पावसामुळे पुराचे पाणी गल्ल्यांमध्ये शिरले आणि त्यामध्ये अनेक गाड्या वाहून गेल्या आणि घरे कोसळली असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

इर्फस्टॅड्टमध्ये पुरामुळे भुस्सखलन झाल्याने अनेक लोक या ढिगाऱ्या खाली गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बेल्जियमलाही या पुराचा फटका बसला असून शुक्रवारच्या आकडेवारीनुसार बेल्जियममधील २० जणांचा आतापर्यंत या पुरामध्ये मृत्यू झालाय. २१ हजार जणांची वस्ती असणाऱ्या भागांमधील वीजपुरवठा खंडित झाल्याचं बेल्जियमने म्हटलं आहे. आमच्या देशामधील हा सर्वात मोठा नैसर्गिक प्रकोप असल्याचं बेल्जियमचं पंतप्रधान अ‍ॅलेक्झॅण्डर डी कूर यांनी गुरुवारी एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करताना सांगितलं. ऱ्हाइनलॅण्ड-पॅलटिनेटमध्ये गुरुवारपर्यंत मृतांचा आखडा ५० होता. तर शेजारी असलेल्या उत्तर ऱ्हाइन-वेस्टफालिया राज्यात ४३ जणांचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं.

इर्फस्टॅड्ट शहरात घरामध्ये अडकून पडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी मदतकार्य पथक तातडीने रवाना झाले असून अनेक जणांचा घरे कोसळून मृत्यू झाल्याचे प्रादेशिक अधिकाऱ्यांनी सांगितले. आम्ही गुरुवारी रात्री ५० जणांची त्यांच्या घरातून सुखरूप सुटका केली, आणखी १५ जणांची सुटका करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे प्रशासकीय अधिकारी फ्रॅन्क रॉक यांनी सांगितले. जर्मनीतील जवळपास १३०० जण अद्यापही बेपत्ता आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. लक्झ्मबर्ग आणि नेदरलँड्सलाही या पुराचा फटका बसला असून येथे हजारो लोकांना स्थलांतरीत करण्यात आलं आहे.

Story img Loader