रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या (WFI) अध्यक्षपदाची निवडणूक संजय कुमार सिंह यांनी जिंकली आहे. संजय सिंह हे भाजपाचे माजी खासदार आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय आहेत. अनेक महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. सिंह यांच्याविरोधात अनेक कुस्तीपटूंनी कित्येक दिवस आंदोलनही केलं. त्यानंतर आता कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. कुस्तीपटूंच्या विरोधामुळे बृजभूषण सिंह ही निवडणूक लढू शकले नाहीत. परंतु त्यांनी त्यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांना या निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आणि त्यांचं पॅनल या निडणुकीत बहुमतासह जिंकलं आहे.
संजय सिंह यांची कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यामुळे बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करणारे कुस्तीपटू नाराज आहेत. तसेच ऑलिम्पिक पदकविजेती कुस्तीपटू साक्षी मलिकने कुस्तीतून सन्यास घेत असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करणारे काही कुस्तीपटू थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत. यावर संजय सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय सिंह म्हणाले, “ज्यांना कुस्ती खेळायचीय त्यांनी कुस्ती खेळा, ज्यांना राजकारण करायचंय त्यांनी राजकारण करावं.
कुस्ती महासंघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय सिंह म्हणाले, लवकरच कुस्तीपटूंच्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचं आयोजन केलं जाईल. खेळाडूंचं वर्ष वाया जाऊ दिलं जाणार नाही. खेळाडूंची ऑलिम्पिकसाठीची तयारी करून घेतली जाईल. आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी खेळाडूंची तयारी करून घेण्यासाठी वेगवेगळी शिबिरं आयोजित केली जातील. तसेच ज्या खेळाडूंना कुस्ती खेळायची आहे त्यांनी कुस्ती खेळावी आणि ज्यांना राजकारण करायचं आहे त्यांना राजकारण करावं.
हे ही वाचा >> WFI Election : कुस्ती महासंघाची कमान बृजभूषण सिंह यांच्याकडेच? संजय सिंह विजयी, अनिता शेरॉन पराभूत
रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदासाठी आज (२१ डिसेंबर) निवडणूक पार पडली. संजय कुमार सिंह यांनी या निवडणुकीत माजी कुस्तीपटू अनिता शेरॉन यांचा पराभव केला आहे. सिंह यांना ४७ पैकी ४० मतं मिळाली आहेत. तर अनिता शेरॉन यांना केवळ सात मतं मिळाली आहेत. दरम्यान, देवेंद्र कार्तियान यांची कुस्ती महासंघाच्या उपाध्यक्षपदी आणि प्रेमचंद लोचब यांची सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.