भारतीय कुस्ती महासंघावरून मोठं घमासान चालू आहे. क्रीडा मंत्रालयाने कुस्ती महासंघाची नवी कार्यकारिणी नुकतीच बरखास्त केली. तसेच निवडणूक जिंकून कुस्ती महासंघाचे अध्यक्ष झालेल्या सजय सिंह यांना निलंबित केलं आहे. दरम्यान, संजय सिंह यांनी भारतीय ऑलिम्पिक संघाविरोधात दंड थोपटले आहे. संजय सिंह म्हणाले, “भारतीय ऑलिम्पिक संघाने नेमलेली अ‍ॅड हॉक कुस्ती समिती (तात्पुरती समिती) मी मानत नाही. तसेच क्रीडा मंत्रालयाने केलेलं निलंबन मला मान्य नाही.” अ‍ॅड हॉक समितीने जयपूर येथे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा (नॅशनल चॅम्पियनशिप) आयोजित करणार असल्याची घोषणा केल्यानंतर संजय सिंह यांनी म्हटलं आहे की, आम्ही (कुस्ती महासंघ) राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा आयोजन करणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुस्ती महासंघाच्या निवडणुकीनंतर तीन दिवसांनी क्रीडा मंत्रालयाने कुस्ती महासंघाची नवी कार्यकारिणी बरखास्त केली. त्यापाठोपाठ चार दिवसांनी कुस्ती महासंघाचा कारभार पाहण्यासाठी तीन सदस्यीय अ‍ॅड हॉक कुस्ती समिती (तात्पुरती समिती) गठित केली. भूपेंद्र बाजवा हे या समितीचे अध्यक्ष आहेत. तर माजी बॅडमिंटनपटू मंजूषा कंवर आणि एमएम सोमाया हे या समितीतले सदस्य आहेत. कुस्ती महासंघाचे नवे अध्यक्ष (संजय सिंह) आणि त्यांच्या जुन्या-नव्या सहकाऱ्यांनी वैयक्तिक कारणांमुळे रेसलिंग फेडरेशनच्या घटनात्मक तरतुदींचं उल्लंघन केलं आहे. तसेच ऑलिम्पिक असोसिएशनच्या तत्त्वांच्या विरोधात स्वतःची मनमानी करत काही निर्णय घेतले होते. त्यामुळेच ऑलिम्पिक असोसिएशनने कुस्ती महासंघाची नवी कार्यकारिणी बरखास्त केली, संजय सिंह यांना निलंबित केलं, तसेच नव्या कार्यकारिणीने तीन दिवसांत घेतलेले सर्व निर्णय रद्द केले आहेत.

भूपेंद्र बाजवा यांच्या अध्यतेखालील अ‍ॅड हॉक कुस्ती समितीने २ ते ५ फेब्रुवारी या काळात जयपूर येथे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं आहे. तसेच सर्व राज्य कुस्ती संघाना सांगितलं आहे की, निलंबित केलेल्या कुस्ती महासंघाच्या कार्यकारिणीशी कोणतेही संबंध ठेवू नयेत. त्यानंतर संजय सिंह यांनी कुस्ती महासंघाच्या (बरखास्त केलेल्या) वतीने राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या आयोजनाबाबत घोषणा केली आहे.

हे ही वाचा >> “बाहुबलीकडून मिळणारा…”, विनेश फोगाटच्या पुरस्कारवापसीवरून राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना टोला

…तर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा कशी खेळवणार? संजय सिंह यांचा प्रश्न

संजय सिंह म्हणाले, ऑलिम्पिक असोसिएशनने केलेलं निलंबन मला मान्य नाही. आमचा कुस्ती महासंघ सुरळीतपणे काम करत आहे. आम्ही स्वतःच राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन करणार आहोत. आम्ही इथे असताना तटस्थ समिती या स्पर्धेचं आयोजन करू शकत नाही. तसेच वेगवेगळी राज्ये त्यांचे संघ पाठवणारच नसतील तर हे लोक (अ‍ॅड हॉक कुस्ती समिती) स्पर्धा कशी आयोजित करणार. आम्ही लवकरच कुस्ती महासंघाच्या कार्यकारिणीची बैठक बोलावणार आहोत. त्यानंतर आम्ही कुस्ती स्पर्धेच्या आयोजनावर चर्चा करून अधिकृत घोषणा करू.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wfi sanjay singh says we neither recognises suspension nor ad hoc panel managing wrestling in india asc
Show comments