व्हॉर्टेन बिझनेस स्कूलने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना परिसंवादात बीजभाषण करण्यासाठी दिलेले निमंत्रण रद्द करायला नको होते, असे मत केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री शशी थरूर यांनी मांडले. मोदी यांना बोलावले असते, तर त्यांनी गुजरातमध्ये केलेल्या कामांबद्दल त्यांच्याकडून ऐकून घेतल्यावर प्रश्नांच्या माध्यमातून त्यांच्या निर्णयांना एकप्रकारे आव्हान देण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली असती, असे मत थरूर यांनी मांडले.
व्हॉर्टेन परिसंवादासाठी मोदी यांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, पेन्सिल्वानिया विद्यापीठातील काही प्राध्यापकांच्या गटाने विरोध केल्यानंतर मोदींना पाठविण्यात आलेले निमंत्रण रद्द करण्यात आले. याविषयावरून अमेरिका आणि भारतात विविध मतमतांतरे उमटत आहेत. त्यापार्श्वभूमीवर थरूर यांनी मोदी यांना अप्रत्यक्षपणे टोचणारे वक्तव्य केले आहे.
मोदी यांच्या विचारांशी मी पूर्णपणे असहमत आहे, असे सांगून थरूर म्हणाले, मात्र, मोदींना बोलावले असते, तर त्यांनी घेतलेल्या विविध निर्णयांचा आणि त्यांच्या आजपर्यंतच्या कारकीर्दीचा आढावा विद्यार्थ्यांना घेता आला असता आणि त्या अनुषंगाने प्रश्न विचारून त्यांना आव्हान देता आले असते. विद्यापीठामध्ये ही अशी एक जागा आहे जिथे तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि त्याची उत्तरेही देऊ शकता. कार्यक्रमासाठी एखाद्याला निमंत्रित केल्यानंतर पुन्हा निमंत्रण रद्द करणे, अयोग्य असल्याचे मत थरूर यांनी मांडले.
मोदींना प्रश्न विचारण्याची संधी व्हॉर्टेनने विद्यार्थ्यांना द्यायला हवी होती – थरुर
व्हॉर्टेन बिझनेस स्कूलने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना परिसंवादात बीजभाषण करण्यासाठी दिलेले निमंत्रण रद्द करायला नको होते, असे मत केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री शशी थरूर यांनी मांडले.

First published on: 07-03-2013 at 01:16 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wharton should have let students challenge narendra modi says shashi tharoor