व्हॉर्टेन बिझनेस स्कूलने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना परिसंवादात बीजभाषण करण्यासाठी दिलेले निमंत्रण रद्द करायला नको होते, असे मत केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री शशी थरूर यांनी मांडले. मोदी यांना बोलावले असते, तर त्यांनी गुजरातमध्ये केलेल्या कामांबद्दल त्यांच्याकडून ऐकून घेतल्यावर प्रश्नांच्या माध्यमातून त्यांच्या निर्णयांना एकप्रकारे आव्हान देण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली असती, असे मत थरूर यांनी मांडले.
व्हॉर्टेन परिसंवादासाठी मोदी यांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, पेन्सिल्वानिया विद्यापीठातील काही प्राध्यापकांच्या गटाने विरोध केल्यानंतर मोदींना पाठविण्यात आलेले निमंत्रण रद्द करण्यात आले. याविषयावरून अमेरिका आणि भारतात विविध मतमतांतरे उमटत आहेत. त्यापार्श्वभूमीवर थरूर यांनी मोदी यांना अप्रत्यक्षपणे टोचणारे वक्तव्य केले आहे.
मोदी यांच्या विचारांशी मी पूर्णपणे असहमत आहे, असे सांगून थरूर म्हणाले, मात्र, मोदींना बोलावले असते, तर त्यांनी घेतलेल्या विविध निर्णयांचा आणि त्यांच्या आजपर्यंतच्या कारकीर्दीचा आढावा विद्यार्थ्यांना घेता आला असता आणि त्या अनुषंगाने प्रश्न विचारून त्यांना आव्हान देता आले असते. विद्यापीठामध्ये ही अशी एक जागा आहे जिथे तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि त्याची उत्तरेही देऊ शकता. कार्यक्रमासाठी एखाद्याला निमंत्रित केल्यानंतर पुन्हा निमंत्रण रद्द करणे, अयोग्य असल्याचे मत थरूर यांनी मांडले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा