सध्या इंडिया नाव जाऊन देशाचं नाव भारत ठेवलं जाणार ही चर्चा जोरात आहे. संसदेचं विशेष अधिवेशनही याच कारणासाठी बोलवलं जातं आहे अशीही चर्चा रंगली आहे. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ९ सप्टेंबरला वेगवेगळ्या विदेशातल्या मान्यवरांना स्नेहभोजनाचे जे निमंत्रण पाठवलं आहे त्यावर प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख आहे. त्यावरुन इंडिया नाव हटवलं जाण्याची चर्चा सुरु झाली आहे.
आपल्या देशाला भारत आणि इंडिया अशी दोन नावं आहेत. भारतीय संविधानात INDIA That is Bharat असा उल्लेख आहे. त्यामुळेच आपल्या देशाला इंडियाही म्हटलं जातं आणि भारतही. ही दोन नावं आपल्या देशाला एका सखोल चर्चेनंतर आणि बऱ्याच वाद विवादानंतर मिळाली आहेत. १९ सप्टेंबर १९४९ या दिवशी या नावाच्या निमित्ताने एक संविधान सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही भूमिका मांडली होती. तर काही सदस्यांनी तेव्हाही इंडिया या नावाला विरोध दर्शवला होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेत काय म्हटलं होतं?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय घटनेचे शिल्पकार म्हटलं जातं. त्यांनी भारत आणि इंडिया या दोन्ही नावांविषयी महत्त्वाची भूमिका मांडली. ते म्हणाले आपण जी चर्चा सुरु केली आहे त्या चर्चेतला कुठलाही सदस्य हा भारत या नावाला विरोध दर्शवतच नाही. सगळ्यांनी आपल्या देशासाठी भारत हे नाव स्वीकारलंच आहे. आता फक्त गोष्ट इतकीच आहे की आपल्याला पर्याय मिळाला आहे. आपण आता फक्त इतकीच चर्चा करतो आहोत की भारत शब्दानंतर इंडिया हा शब्द आला पाहिजे. यावेळी किशोरी मोहन त्रिपाठी यांनी यांनी भारत शब्द हा आपल्या देशाच्या गौरवाशी कसा संबंधित आहे हे देखील सांगितलं. त्यावर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की याबाबत चर्चा आवश्यक आहे का?
इंडिया नावावर अनेकांनी घेतला होता आक्षेप
देशाचे नाव आणि अनुच्छेद १ मधील तरतूद याबद्दल प्रत्यक्ष चर्चेला सुरुवात झाल्यानंतर अनेक नेत्यांनी ‘इंडिया’ या नावावर आक्षेप व्यक्त केला होता. या नावामुळे वसाहतवादी भूतकाळाची आठवण होते, असे मत या नावाला विरोध करणाऱ्या नेत्यांनी मांडले होते. जबलपूर येथील शेठ गोविंद दास यांनी इंडियाऐवजी देशाचे नाव भारत असावे, अशी भूमिका मांडली. तर काही नेत्यांनी भारत या नावासाठी इंग्रजी भाषेत इंडिया हे नाव पर्याय आहे, असा उल्लेख असावा, अशी भूमिका मांडली. ‘इंडिया म्हणजेच भारत (इंडिया दॅट इज भारत)’ हे शब्द देशाच्या नावासाठी योग्य नाहीत. त्याऐवजी ‘भारत देशाला परदेशात इंडिया म्हटले जाते’, असा उल्लेख करावा, अशी भूमिका शेठ गोविंद दास यांनी घेतली होती. इंडियन एक्स्प्रेसने याबाबतंच वृत्त दिलं आहे.
कामथ यांनी दिला आयर्लंड देशाचा संदर्भ
हरी विष्णू कामथ यांनीदेखील इंडिया या नावाला विरोध केला होता. त्यासाठी त्यांनी आयर्लंडच्या संविधानाचा दाखला दिला होता. इंडिया हा शब्द भारत या शब्दाचे फक्त इंग्रजी भाषांतर आहे, असे ते म्हणाले होते. “आयर्लंडने १९३७ साली संविधानाचा स्वीकार केलेला आहे. या संविधानाचा अभ्यास केल्यास काही गोष्टी स्पष्ट होतात. सभागृहातील सदस्यांनी या संविधानाचा संदर्भ घेण्याची तसदी घ्यावी. आधुनिक जगात आयर्लंड हा असा देश आहे की, ज्याने स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वत:चे नाव बदलले आहे. या संविधानाच्या चौथ्या अनुच्छेदात या बदलाचा संदर्भ आहे. ‘या राज्याचे नाव आयर (Eire) आहे किंवा इंग्रजी भाषेत हे नाव आयर्लंड असे आहे,’ असे आयर्लंडच्या संविधानात नमूद आहे,” असे तेव्हा कामथ म्हणाले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका मात्र काहीशी वेगळी होती. भारत या नावाला सदस्यांचा विरोध नसल्यामुळे भारत नावाचा इतिहास, संस्कृती याविषयी वादविवाद अनावश्यक असल्याची आठवण डॉ. आंबेडकर यांनी सभागृहाला अनेकदा करून दिली होती. तसेच कामथ यांनी घेतलेल्या आक्षेपांना उत्तर देताना “आता आपण फक्त इंडिया या शब्दानंतर भारत हा शब्द यावा का? यावर चर्चा करीत आहोत,” असेही आंबेडकर म्हणाले होते.