Global Media on Delhi election Result : ८ फेब्रुवारी रोजी जाहीर झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत ७० पैकी ४८ जागा जिंकून भारतीय जनता पक्ष २७ वर्षांहून अधिक काळानंतर दिल्लीत आपले सरकार स्थापन करणार आहे. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाने २२ जागांवर विजय मिळवला तर काँग्रेसला सलग तिसऱ्यांदा एकही जागा मिळाली नाही. २०२५ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या दणदणीत विजयाने जागतिक माध्यमांचेही लक्ष वेधून घेतले आहे, अनेक माध्यमांनी याला भारताच्या राजधानीतील एक मोठे राजकीय बदल म्हणून संबोधले आहे. दिल्ली निवडणूक निकालांचे लाईव्ह अपडेट्स फॉलो करा.
वृत्तसंस्था रॉयटर्सने निवडणूक निकालाचे वर्णन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पक्षासाठी “महत्त्वाचा विजय” असे केले आहे. यामध्ये भाजपाचा प्रचार प्रशासन, कायदा व सुव्यवस्था आणि पायाभूत सुविधांवर कसा केंद्रित होता हे अधोरेखित केले आहे. “या विजयामुळे शहरी भागात, विशेषतः मध्यमवर्गीय मतदारांमध्ये पक्षाचे वाढते आकर्षण अधोरेखित होते जे एकेकाळी ‘आप’ला पाठिंबा देत होते”, असे अहवालात म्हटले आहे. तर वृत्तसंस्था असोसिएटेड प्रेस (एपी) ने दिल्लीत भाजपच्या सत्तेत पुनरागमनाला “मोठे राजकीय पुनरागमन” म्हटले आहे आणि ‘आप’ची घटती लोकप्रियता आणि अंतर्गत संघर्षांमुळे त्यांच्या पराभवात भूमिका बजावली आहे असे नमूद केले आहे. त्यांनी असेही नमूद केले आहे की, काँग्रेसच्या मतांच्या टक्केवारीत किरकोळ वाढ होऊनही, ते या स्पर्धेत दूरचा खेळाडू राहिले.
दिल्ली आपचा शेवटचा गड होता
फायनान्शियल टाईम्सने अधिक विश्लेषणात्मक दृष्टिकोन स्वीकारला. यामध्ये निकालांचा भारताच्या व्यापक राजकीय परिदृश्यावर कसा परिणाम होऊ शकतो यावर चर्चा केली. एकेकाळी एक मजबूत प्रादेशिक शक्ती म्हणून पाहिले जाणारे आप आता अस्तित्वाच्या संकटाचा सामना करत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. “दिल्ली हा आपचा शेवटचा गड होता. भाजपाकडून पराभव झाल्याने त्यांच्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे”, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
अल जझीरा राजकीय विश्लेषक रशीद किडवाई यांच्याशी बोलले. त्यांच्या प्रतिक्रियेनुसार वृत्तात म्हटलंय की, निकाल महत्त्वपूर्ण आहेत. “कारण हा विजय मतदारसंघांमधील भाजपाच्या सूक्ष्म व्यवस्थापनाची कथा आहे आणि ते अतुलनीय आहे.
“दिल्ली हे एक छोटे भारत आहे, येथे देशाच्या विविध भागांमधून मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आहे. भाजपाने हे दाखवून दिले आहे की जर ते दिल्ली जिंकू शकले तर ते काहीही जिंकू शकतात”, रशीद किदवाई यांनी अल जझीराला सांगितले.
भाजपाने व्यवस्था घट्ट बांधली आहे
“असे वाटते की भाजप पुन्हा कधीही निवडणूक हरणार नाही. त्यांनी व्यवस्था घट्ट बांधली आहे”, असे दिल्लीच्या प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) राजकारणाच्या प्राध्यापिका निवेदिता मेनन यांचे म्हणणे आहे. बीबीसीने या निवडणुकीचे वर्णन भाजप आणि आप दोघांसाठीही प्रतिष्ठेची लढाई म्हणून केले आहे. अहवालात अधोरेखित केले आहे की, भाजपासाठी दिल्ली मिळवणे हे केवळ निवडणूक यशापेक्षा जास्त आहे.