CEO Suchana Seth Killed Son : स्टार्टअप एआय कंपनीची सीईओ सूचना सेठ हिच्यावर तिच्या चार वर्षीय मुलाची हत्या केल्याचा आरोप आहे. तिने गोव्यात मुलाची हत्या करून बंगळुरूला जाण्यासाठी कॅब केली होती. रस्तेमार्गेपेक्षा विमान प्रवास स्वस्त पडला असता असा सल्ला दिल्यानंतरही तिने रस्तेमार्गे प्रवासाचा निर्णय घेतला. तसंच, ३० हजार रुपये भाडं असणारी कॅब बूक केली. या हत्येचा उलगडा झाल्यानंतर सातत्याने नवनवे खुलासे समोर येत आहेत. आता कॅबचालकाचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. गोवा ते कर्नाटकदरम्यानच्या प्रवासात सूचना सेठच्या हालचाली कशा होत्या? कॅब चालकाने गाडी पोलीस ठाण्यापर्यंत कशी नेली इथपर्यंत सगळा घटनाक्रम कॅबचालकाने सांगितला आहे.
इंडिया टुडेने कॅबचालक रायजॉन डिसूझा याच्याशी संवाद साधला. त्याने या घटनेचा पूर्ण क्रम सांगितला आहे. सात जानेवारी रोजी डिझूझाने उत्तर गोव्यातील कँडोलिम येथील सोल बनियन ग्रेंड नावाच्या सर्व्हिस अपार्टमेंटमधून सूचना सेठ यांना पिकअप केलं.”मला रात्रीच्या वेळी सर्व्हिस अपार्टमेंटमधून फोन आला की मला एका महिलेला तातडीने बेंगळुरूला सोडायचे आहे”, असं डिझूझा म्हणाला. तसंच, तिची वागणूक सुरुवातीपासूनच संशयास्पद होती, असंही त्याने सांगितलं.
हेही वाचा >> CEO Suchana Seth Killed Son : हॉटेलच्या खोलीत आढळलेले रक्ताचे डाग कोणाचे? पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर
डिसूझासह दोन ड्रायव्हर मध्यरात्री साडेबारा वाजता अपार्टमेंटमध्ये आले. तर १ वाजता त्यांनी सूचना सेठला पिकअप केलं. सूचनाने हॉटेलच्या रिसेप्शनमधून बॅग गाडीत ठेवायला सांगितली. त्यावेळी त्याला ती बॅग जड लागली. याबाबत डिझूझा म्हणाला, “मी रिसेप्शनमधून बॅग उचलली. ती काळ्या रंगाची बॅग होती आणि ती खूप जड होती. पण त्यावेळी मला इतका संशय आला नाही.”
ट्राफिक जाममध्येही राहिली शांत
“मी तिला विचारले की पिशवी इतकी जड का आहे आणि त्यात दारूच्या बाटल्या आहेत का? त्यावर मॅडम म्हणाल्या हो, दारूच्या बाटल्या होत्या”, असंही त्याने सांगितलं. सूचना सेठ संपूर्ण प्रवासात अतिशय शांत होती आणि पाण्याची बॉटल घ्यायला एका ठिकाणी थांबली. गोवा-कर्नाटक सीमेवर वाहतूक कोंडी लागली. यावेळी चार तास आमचे वाहतूक कोंडीत गेले. तेव्हाही सेठने अत्यंत संयमाची भूमिका घेतली. वाहतूक कोंडी कमी व्हायला ५ ते ६ तास लागतील असं सांगून यु टर्न घेऊन विमानतळावर सोडू का असंही मी तिला विचारलं. पण तिने नकार दिला आणि ट्राफिक कमी झाल्यावर आपण जाऊ असंही त्या म्हणाल्या, अशी माहिती डिझूझाने दिली.
हेही वाचा >> CEO Killed Son : गोवा ते बंगळुरू टॅक्सीचं भाडं ३० हजार; चालक म्हणाला, “सूचना सेठच्या हातातील बॅग उचलली तेव्हा…”
“मग मला थोडं विचित्र वाटलं कारण एका बाजूला तिला जायची घाई होती आणि दुसरीकडे वाहतूक कोंडी असूनही तिला कोणतीही अडचण नव्हती. जेव्हा आम्ही कर्नाटक सीमा ओलांडली तेव्हा मला गोवा पोलिसांचा फोन आला आणि विचारले की महिलेसोबत एक मूल आहे का? मी याचे कारण विचारले असता ते म्हणाले की महिलेच्या खोलीत रक्ताचे डाग सापडले आहेत. आणि ती हॉटेलवर आली तेव्हा तिच्याकडे एक मूल होतं, परंतु जाताना ती एकटीच गेली, असं डिझूझा म्हणाला.
हेही वाचा >> सूचना सेठने ४ वर्षाच्या मुलाला संपवण्याआधी कुटुंब व मित्रांकडे मांडली होती खंत; म्हणाली, “मुलाचं तोंड पाहिलं की..”
“नंतर, मला पोलिसांकडून दुसरा फोन आला की सूचना सेठने दिलेला पत्ता आणि तपशील खोटे आहेत. आता मला शंभर टक्के खात्री होती की काहीतरी गडबड आहे. त्यामुळे पोलिसांनी मला जवळच्या पोलीस ठाण्यात गाडी थांबवण्यास सांगितली. मी गुगल मॅपवर पाहिले, पण जवळचे पोलीस ठाणे यू-टर्नच्या मागे असल्याचे दिसलं. जर मी यू-टर्न घेतला असता, तर तिला कूणकूण लागली असती. म्हणून मी यु टर्न घेतला नाही, असं डिसूझा म्हणाला.
पोलिसांचे फोन येऊ लागल्याने…
कर्नाटकातील फलक स्थानिक भाषेत असल्याने मला दिशा समजू शकत नव्हती. त्यामुळे मी गाडी एका रेस्टॉरंटमध्ये थांबवली आणि जवळचे पोलीस ठाणे कुठे आहे याची गार्डकडे चौकशी केली. मग मी गाडीत बसलो आणि पोलीस स्टेशनला पोहोचलो. पोलीस स्टेशनमध्ये गाडी उभी करताच सूचना सेठने विचारलं की मला इथे का आणलंस? मी तिला सांगितलं की मला पोलिसांचे खूप फोन येत आहेत आणि त्यांना तुझ्याशी बोलायचं होतं”, अशी माहितीही डिसूझाने म्हणाला. पोलीस ठाण्यात पोहोचताच डिझूझाने त्याची गाडी पोलिसांच्या ताब्यात दिली. पोलिसांनी या गाडीची तपासणी केली असताना पिशवीत मुलाचा मृतदेह सापडला.
हेही वाचा >> सीईओ सूचना सेठने मुलाची हत्या करण्याआधी पतीला केला होता ‘हा’ मेसेज, पोलीस तपासात खुलासा
दरम्यान, “संपूर्ण प्रवासात मॅडम शांत राहिल्या आणि कोणतीही अस्वस्थता दाखवली नाही. त्यांनी कोणाला फोनही केला नाही की कोणाचा त्यांना फोनही आला नाही. फक्त एक फोन आला होता, परंतू तोही अपार्टमेंटमधून आला असावा, असं डिझूझा म्हणाला. “जेव्हा मृतदेह बाहेर काढण्यात आला तेव्हाही ती चिंतेत दिसत नव्हती”, असंही त्याने पुढे सांगितलं.