पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारविरोधात काँग्रेसने मणिपूरचा प्रश्न पुढे करत अविश्वास प्रस्ताव आणला आहे. लोकसभेत या विषयावर चर्चा सुरु झाली आहे. सत्ताधारी पक्षातले खासदार आणि विरोधी पक्षातले खासदार चर्चा करत आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना मौन बाळगलं आहे असं म्हणणारे इथे बसले आहेत मात्र जेव्हा ते (UPA) सत्तेत असताना त्यांनी मौन बाळगण्याशिवाय काय केलं? असा प्रश्न आता शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी विचारला आहे. तसंच हनुमान चालीसाचा मुद्दा समोर आल्यानंतर ती म्हणूनही दाखवली.
काय म्हणाले श्रीकांत शिंदे?
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित आहे. आज आपली अर्थव्यवस्था ही जगातली पाचव्या क्रमाकांवर गेली आहे. मागच्या नऊ वर्षांमध्ये मोदींनी देशाची प्रगती आणि विकास मोठ्या प्रमाणावर केला आहे. मी महाराष्ट्रातला खासदार आहे. त्यामुळे महाराष्ट्राबद्दल मी बोलणारच. महाराष्ट्रात कुणाला कल्पनाही नव्हती अशा गोष्टी घडल्या. स्वार्थासाठी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आले. महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा महाराष्ट्रात होतं तेव्हा बुलेट ट्रेन, मेट्रो, समृद्धी महामार्ग या प्रकल्पांमध्ये खोडा घालण्यात आला. आरेमध्ये कारशेड होऊ दिलं नाही. त्यामुळे मेट्रोचा खर्च १० हजार कोटींनी वाढला आहे. पायाभूत सुविधांची यांना आवश्यकताच वाटली नव्हती कारण ते (उद्धव ठाकरे) घराच्या बाहेर पडत नव्हते. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना एक नवा रेकॉर्ड केला. अडीच वर्षात फक्त अडीच दिवस ते मंत्रालयात गेले.”
उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका
“आज काही लोक इथे म्हणत आहेत गद्दारांमध्ये अमित शाह बसले आहेत. मला त्यांना विचारायचं आहे की तुम्ही कुणाचे फोटो लावून २०१९ ची निवडणूक लढली? भाजपा आणि शिवसेनेला लोकांनी जनमत दिलं होतं. बाळासाहेब ठाकरेंचे विचार यांनी बाजूला ठेवले आणि महाविकास आघाडी स्थापन केली. उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या विचारांपासून दूर गेले. निवडणूक भाजपासह लढले आणि खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार उद्धव ठाकरेंनी बाजूला ठेवले.”
श्रीकांत शिंदे यांनी म्हणून दाखवली हनुमान चालीसा
“आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे घेऊन जात आहोत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना तुरुंगात डांबलं गेलं.” हे वाक्य जेव्हा श्रीकांत शिंदेंनी उच्चारलं तेव्हा विरोधी बाकांवरुन आवाज आला तुम्हाला हनुमान चालीसा म्हणता येते का? त्यावर श्रीकांत शिंदे म्हणाले होय मला पूर्ण हनुमान चालीसा येते आणि त्यांनी मग लोकसभेत संपूर्ण हनुमान चालीसा म्हणून दाखवली. त्यावेळी शिवसेनेच्या आणि भाजपाच्या खासदारांनी बाक वाजवले आणि श्रीकांत शिंदे यांचं कौतुक केलं. एवढंच नाही तर श्रीकांत शिंदे म्हणाले आम्ही बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारे शिवसैनिक आहोत आम्ही फक्त त्यांचं नाव घेऊन राजकारण करणारे नाही. मात्र आज श्रीकांत शिंदेल यांनी जी हनुमान चालीसा म्हटली त्याबाबत चांगलीच चर्चा लोकसभेत होते आहे.