मागील काही दिवसांपासून टोमॅटोचे दर गगनाला भीडत आहेत. आता काही प्रमाणत दर उतरले आहेत. मात्र, मधल्या काळात टोमॅटोचा दर २५० ते ३०० रुपये प्रतिकिलो इतका होता. त्यामुळे टोमॅटो खाणं सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याच्या बाहेर गेलं होतं. यावरून देशभर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. वाढत्या महागाईविरोधात आंदोलनंही झाली.
दरम्यान, एका हिंदी वृत्तवाहिनीच्या पत्रकारने टोमॅटोच्या वाढत्या दराबाबत प्रश्न विचारला असता केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अजब प्रतिक्रिया दिली आहे. जेव्हा टोमॅटोचा दर २५० ते ३०० रुपये प्रतिकिलो इतका झाला, तेव्हा तुमच्या घरात यावर चर्चा होत होती का? असा प्रश्न विचारला असता स्मृती इराणी यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी टिव्ही पत्रकार सुधीर चौधरींना प्रतिप्रश्न केला, “सुधीरजी, तुम्ही जेव्हा तुरुंगात होता, तेव्हा काय झालं? असं मीही तुम्हाला विचारू शकते.” टोमॅटो दरवाढीवरून प्रश्न विचारणं हा खासगी प्रश्न आहे, असं ही स्मृती इराणी म्हणाल्या.
या मुलाखतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरून नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. पत्रकार सुधीर चौधरी हे ‘आज तक जी-२० समिट’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची मुलाखत घेत होते. यावेळी त्यांनी टोमॅटोच्या भाववाढीवरून प्रश्न उपस्थित केला असता इराणी यांनी संताप व्यक्त केला. या मुलाखतीमधील काही सेकंदाची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
‘द इकोनॉमिक टाइम्स’च्या वृत्तानुसार, २०१२ मध्ये तत्कालीन ‘झी न्यूज’चे संपादक सुधीर चौधरी यांच्यासह ‘झी बिझनेस’चे संपादक समीर अहलूवालिया यांच्या लाचखोरी प्रकरणी कारवाई करण्यात आली होती. याप्रकरणी दोघांना २० दिवस तुरुंगातही जावं लागलं होतं. काँग्रेसचे माजी खासदार आणि उद्योगपत्ती नवीन जिंदल यांच्या तक्रारीवरून सुधीर चौधरी आणि समीर अहलूवालिया यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. दोघांनी जिंदल कंपनीकडे १०० कोटी रुपयांची खंडणी मागितली होती, असा आरोप करण्यात आला होता. याच प्रकरणाचा संदर्भ देत, स्मृती इराणी यांनी सुधीर चौधरी यांच्यावर संताप व्यक्त केला.