आपल्या मातृभाषेशिवाय दुसऱ्या भाषेत असलेली एखादी कादंबरी किंवा लघुकथा संग्रह वाचला, तरी त्यात वाचकाकडून भावनिक प्रतिसाद फार कमी दिला जातो, त्या कादंबरी किंवा कथेतील पात्र आनंदी दाखवले असले, तरी आपल्या चेहऱ्यावर हास्य विलसत नाही असे एका नवीन अभ्यासात दिसून आले आहे.
जेव्हा एखादी कादंबरी किंवा कथासंग्रह वाचतो, तेव्हा आपण त्यातील पात्रांच्या शारीरिक व भावनिक क्रियांची पुनरावृत्ती करीत असतो. ‘इंटरनॅशनल स्कूल ऑफ अ‍ॅडव्हान्सड स्टडीज’ या इटलीच्या संस्थेतील संशोधक फ्रॅनसेस्को फोरोनी यांनी हा परिणाम यापूर्वीच्या संशोधनात दाखवला होता. आपण प्रौढ वयात जेव्हा दुसऱ्या भाषेतील पुस्तक वाचतो तेव्हा नेमके काय घडते हे दाखवून दिले आहे, हे त्यांनी नवीन संशोधनात दाखवून दिले आहे.
फोरोनी यांच्या मते आपण जेव्हा भावनिक स्तरावरची माहिती ग्रहण करतो, तेव्हा त्यावरचे संस्करण व नंतर शारीरिक प्रतिसाद हा कथा-कादंबरीतील पात्रासारखाच असतो, जेव्हा आपण या पुस्तकातील एखादी आनंदी व्यक्तिरेखा अनुभवत असतो, तेव्हा आपल्या चेहऱ्यावर हसू उमटते, त्यातील पात्र रागावलेले असेल तर आपणही किंचित रागावलेले दिसतो, पण ते आपल्याला जाणवतही नसते. जर आपण मातृभाषेशिवाय दुसऱ्या भाषेतील पुस्तक वाचत असू तर असे उत्स्फूर्त प्रतिसाद येत नाहीत, किंबहुना त्यांची तीव्रता कमी असते. एकूण २६ व्यक्तींना इंग्रजी कथा कादंबऱ्या वाचण्यास देण्यात आल्या व इलेक्ट्रोमायोग्राफी तंत्राने त्यांच्या स्नायूंच्या हालचाली टिपण्यात आल्या. या लोकांची मातृभाषा डच होती त्यामुळे त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षांनंतर इंग्रजी शाळेत शिकलेले होते. जेव्हा त्यांना मातृभाषेतील पुस्तके वाचायला देण्यात आली, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील भाव बदलेले दिसले. त्यांच्या भावना अधिक तीव्र होत्या. आपण भावनात्मक शब्द हे आईकडून शिकतो. आई मुलाला आता हास बघू असे सांगून हसून दाखवते, तेव्हा मुलाला शब्द व हसण्याची कृती यांचे नाते लक्षात येते. कथा-कादंबरी वाचताना त्यातील पात्रे आपल्यात नकळत भिनत जातात व तशी अभिव्यक्ती आपण करीत असतो. आपण जेव्हा दुसरी भाषा शिकतो, तेव्हाचे वातावरण हे औपचारिक असल्याने आपल्याला ती भाषा समजली, तरी त्यातील पात्रे आपल्याशी भावनिक जवळीक फार खोलवर साधू शकत नाहीत. शब्दातून भावना समर्थपणे व्यक्त केलेली असली, तरी ती आपली दुय्यम भाषा असल्याने मातृभाषेत साधला जाणारा भावनिक परिणाम अनुभवाला येत नाही. ‘ब्रेन अँड कॉग्निशन’ या नियतकालिकात हा शोधनिबंध प्रकाशित झाला आहे.

मातृभाषेची महती
* मातृभाषा वाचकाशी जास्त भावनात्मक जवळीक साधते
* कथा-कादंबरीतील पात्रे संचारल्याप्रमाणे आपण प्रतिसाद देतो
* हा प्रतिसाद इलेक्ट्रोमायोग्राफीने मोजला जातो
* दुय्यम भाषेत साहित्यकृतीतील पात्रे मातृभाषेइतकी जवळीक साधत नाहीत.