DeepSeek vs ChatGPT Technology by Nvidia: भारतीय शेअर बाजारात गेल्या काही आठवड्यांपासून सातत्याने दिसणाऱ्या पडझडीमुळे गुंतवणूकदारांमध्ये मोठी चिंता पसरली आहे. पण आता अमेरिकन शेअर बाजारात एका चीनी उत्पादनामुळे मोठा गहजब उडाला आहे. चीनच्या DeepSeek या तंत्रज्ञानामुळे अमेरिकेचा शेअर बाजार तब्बल ३ टक्क्यांनी कोसळला आहे. खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डीपसीक हा अमेरिकेतील कंपन्यांसाठी इशारा असल्याची भूमिका मांडली आहे. सोमवारी डीपसीक लाँच झाल्यानंतर Nvidia चे शेअर्स चार महिन्यातील नीचांकी स्तरावर पोहोचले आहेत!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय आहे हे DeepSeek?

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारं DeepSeek तंत्रज्ञान म्हणजे सोप्या शब्दांत ChatGPT चा चीनी पर्याय आहे. मात्र, यात सर्वात महत्त्वाचा फरक म्हणजे चॅटजीपीटीपेक्षा अतिशय कमी खर्चात हे तंत्रज्ञान उभं करण्यात आलं आहे. अॅपलच्या अॅप स्टोअरवर DeepSeekचं मोबाईल अॅप मोफत डाऊनलोड करता येत असून चॅटजीपीटीप्रमाणेच विचारलेल्या बाबींवर हे तंत्रज्ञान आपल्याला माहिती पुरवतं.

अमेरिकन शेअर बाजारात उलथापालथ

सोमवारी डीपसीक लाँच झाल्यानंतर अमेरिकन शेअर बाजारात अक्षरश: उलथापालथ झाल्याचं दिसून आलं. एनविडियाच्या शेअर्सनं गेल्या चार महिन्यांतली एका दिवसातली सर्वात मोठी घसरण नोंदवली. त्यामुळे कंपनीचं तब्बल ६०० बिलियन डॉलर्सचं नुकसान झालं. त्यामुळे अमेरिकेतील तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचा वरचष्मा असणाऱ्या नॅसडॅक (Nasdaq) शेअर बाजारात तीन टक्क्यांहून मोठी घसरण पाहायला मिळाली.

DeepSeek चा इतका मोठा फटका का बसला?

या चीनी तंत्रज्ञानाचा इतका मोठा फटका बसण्यामागची काही कारणं सध्या चर्चेत आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे डीपसीक हे चॅटजीपीटीसारखीच माहिती पुरवतं, पण अत्यंत कमी सामग्रीचा वापर करून आणि पर्यायाने कमी खर्चात! त्यामुळे आत्तापर्यंत अस्तित्वात असणाऱ्या एआय मॉडेलसाठी लागणारी खर्चिक सामग्री, चिप आणि इतर तंत्रज्ञानाची गरज मोठ्या प्रमाणावर घटली. त्यामुळे ही चिपसारखी अशी सामग्री तयार करणाऱ्या एनविडियासारख्या कंपन्यांना याचा मोठा फटका बसला.

यातली दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आत्तापर्यंत ChatGPT मुळे एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात अमेरिकेचा वरचष्मा होता. पण डीपसीकमुळे अमेरिकेची ही हुकमत डळमळीत झाल्याचं दिसून येत आहे. चीन डीपसीक तंत्रज्ञानामुळे या क्षेत्रात मोठ्या वेगाने वाटचाल करताना दिसू लागला आहे. बायडेन प्रशासनानं याआधी अमेरिकेतून अशा चिप आणि त्या बनवण्यासाठीची यंत्रसामग्री निर्यात करण्यावर बऱ्याच अंशी नियंत्रण ठेवलं होतं. पण आता त्यांची मोठ्या प्रमाणावर निर्यात होऊ लागल्यामुळे या गोष्टी इतर देशांमध्ये सहज उपलब्ध होऊ लागल्या आहेत.

हा धोक्याचा इशारा का?

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी DeepSeek तंत्रज्ञानाला अमेरिकेतील उद्योगांसाठीचा इशारा असल्याचं म्हटलं आहे. पण त्याचवेळी ही सकारात्मक बाबदेखील असल्याचं ते म्हणाले. “हा आपल्याकडच्या उद्योगांसाठी इशारा आहे. कारण आता आपण या क्षेत्रात स्पर्धा करून जिंकण्यावर अधिक जोर देण्याची गरज अधोरेखित झाली”, असं ट्रम्प म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is deepseek technology challenging chatgpt in american market collapsed pmw