Honey Scam Controversy Explained : मिस्टर बीस्ट (MrBeast) सारख्या जगप्रसिद्ध युट्यूबर्सनी जाहिरात केलेले ब्राऊजर एक्सटेंशन ‘हनी’ हे सध्या चांगलेच वादात सापडले आहे. एका यूट्यूबरने या कंपनीवर ग्राहकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. या आरोपांनंतर एकच खळबळ उडाली आहे. टेक कंपन्या आणि संबंधित उत्पादनांबद्दल माहिती देणारा न्यूझीलंड येथील युट्यूबर मेगालॅग (MegaLag)ने २१ डिसेंबर २०२४ रोजी एक्सपोसिंग द हनी इन्फ्लुएन्सर स्कॅम असे नाव देण्यात आलेला एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्याने हनी या कंपनीवर लिंक हायजॅकिंग, मर्यादित कुपन पर्याय आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीसंबंधी आरोप केले. नेमका हा हनी घोटाळा (Honey Scam) काय आहे याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.
हनी नेमकं काय आहे?
हनी हे एक मोफत वापरासाठी २०१२ मध्ये लॉन्च करण्यात आलेलं ब्राऊजर एक्सटेन्शन आहे. याच्या माध्यमातून लोकांना इंटरनेटवरील ३०,००० हजारपेक्षा जास्त वेबसाईटवरती उपलब्ध असलेले कूपन्स शोधता येतात. हे एक्सटेन्शन वापरल्याने कोणते कूपन तुमचे सर्वाधिक पैसे वाचवेल हे पाहण्यासाठी प्रत्येक कूपन वेगळं लागू करून पाहण्याची गरज उरत नाही. तुम्ही बिलाचे पैसे देत असताना या एक्सटेन्शनच्या मतदीने कूपन आपोआप लागू होते.
यामध्ये एखादी वस्तू ‘ड्रॉपलिस्ट’मध्ये टाकण्याचा पर्याय देखील मिळतो, ही एक प्रकारची विशलिस्ट असते. जेव्हाया एक्स्टेन्शनला त्या वस्तूची किंमत कमी झाल्याचे दिसून येते तेव्हा याच्या माध्यमातून तुम्हाला नोटिफिकेशन पाठवले जाते.
PayPal या कंपनीने सुमारे ४ अब्ज डॉलर्स इतकी किंमत देऊन २०२० मध्ये हनी विकत घेतले आणि तेव्हापासून, ब्राउझर एक्सटेन्शनची खूपच मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच या एक्सटेन्शनच्या वापरकर्त्यांना PayPal रिवॉर्ड्स, कॅशबॅक आणि गिफ्ट कार्ड अशा ऑफर देऊन हनी एक्सटेन्शन वापरण्यास प्रोत्साहित केले जाते.
फसवणूक कशी केली जातेय?
मेगालॅग या युट्यूबरने या हनी घोटाळ्यासंबंधी तीन व्हिडीओची मालिका तयार केली आहे. ज्यामध्ये पहिल्या व्हिडीओत त्याने आरोप केला आहे की हनीने इन्फ्लुएन्सर्सकडून वापरल्या जाणाऱ्या अॅफिलिएट लिंकशी छेडछाड करत, त्यांच्या ट्रॅकिंग कुकींमध्ये बदल केला आणि इन्फ्लुएन्सर्सनी त्यांच्या प्रॉडक्ट्सच्या विक्रीतून कमावलेल्या कमिशनमधील मोठा हिस्सा चोरी केला.
अफिलिएट कमिशन (affiliate commission) हे कंटेट क्रिएटर्स किंवा इन्फ्लुएन्सर्सना त्यांच्या सब्सक्रायबर किंवा फॉलोअरने त्यांचे एखादी वस्तू किंवा उत्पादन विकत घेतल्यानंतर मिळणारी कमाई असते. विशेष म्हणजे एखादे डिस्काउंट कूपन आढळले नाही तरीही हनी असा प्रकार करत असल्याचा आरोपही मेगालॅगने केला आहे.
उदाहरणार्थ, जेव्हा एखाद्या क्रिएटर NordVPN सबस्क्रिप्शनमधून ३५ डॉलरचे कमिशन कमवतो, तर कथितपणे हे कमिशन हनीकडे रीडिरेक्ट केले जाते आणि वापरकर्त्याला फक्त ०.८९ डॉलर इतका कॅशबॅक मिळतो. या दाव्यावर स्पष्टीकरण देताना हनीने सांगितले की ते बाजारातील स्टँडर्सप्रमाणे ‘लास्ट क्लिक अट्रीब्युशन’चे पालन करतात, ज्यामध्ये वापरकर्त्यांना अफिलिएट लिंक्सएवजी उबलब्ध असलेल्या सर्वोत्तम डिलकडे रिडायरेक्ट केले जाते.
हेही वाचा>> “लहान आकाचा एन्काऊंटरही होऊ शकतो”, पोलीस कोठडीतील वाल्मिक कराडबाबत वडेट्टीवारांचा खळब…
या बड्या युट्यूबर्सचीही फसवणूक
मेगालॅगने या प्रकारे हनीने Linus Tech Tips, MKBHD, MrBeast, MrWhoseTheBoss, PewDiePie आणि याप्रमाणेच इतरही प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर्स आणि कंटेंट क्रिएटर्सकडून लाखो डॉलर्स चोरल्याचा आरोप केला आहे.
युट्यूबरने मेगालॅगने असेही म्हटले आहे की, हनी हे सर्वोत्तम उपलब्ध कूपन कोड शोधून देण्यासाठी ओळखले जाते, परंतु तपासादरम्यान असे आढळून आले आहे की, हनी हे त्यांच्या भागीदार स्टोअरकडून देण्यात आलेल्या कूपनला प्राधान्य देते आणि वापरकर्त्यांना इतरत्र मिळू शकणाऱ्या चांगल्या डीलकडे दुर्लक्ष केले जाते आहे.