उत्तर प्रदेशात काही भाजप नेत्यांनी लव्ह जिहादच्या मुद्दय़ावर डंका पिटणे सुरूच ठेवले असताना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मात्र लव्ह जिहादविषयी आपल्याला काही कल्पना नसल्याचे सांगितले. लव्ह जिहादवर मत विचारले असता त्यांनी हसत हसत लव्ह जिहाद म्हणजे काय अशी विचारणा केली.
भाजपचे नेते लक्ष्मीकांत बाजपेयी व योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकांपूर्वी हा मुद्दा लावून धरला असून, अघोषितपणे याच मुद्दय़ावर प्रचारात भर देण्याचे ठरवले आहे.
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व गुजरातेत हिंदू मुलींना मुस्लिमांपासून दूर राहण्याचा सल्ला भाजप नेत्यांनी दिल्याकडे लक्ष वेधले असता त्यांनी सांगितले, की अरे ये क्या हैं क्या, मुझे नही मालूम (लव्ह जिहाद काय आहे हे आपल्याला माहीत नाही.) त्यांनी असे सांगताच पत्रकार परिषदेत हशा उसळला. सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यानिमित्त त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यात लव्ह जिहादविषयी कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले.
उत्तर प्रदेशातील खासदार आदित्यनाथ यांनी अलीकडेच जिहादच्या नावाखाली प्रेम आपल्याला स्वीकारार्ह नाही असे सांगून भाजप सरकारच हिंदू मुलींचे सक्तीने धर्मातर थांबवू शकते असे विधान केले होते.
नरेंद्र मोदी यांच्याशी मतभेद असल्याचा इन्कार करून राजनाथ सिंह म्हणाले, की  आमच्या दोघांतील संबंध सौहार्दाचे आहेत. मोदी हे आमचे पंतप्रधान आहेत व प्रभावी पंतप्रधान आहेत व आपण गृहमंत्री आहोत.
हमारे संबंध मधुर थे, मधुर हैं और मधुर रहेंगे (आमचे संबंध मधुर होते, आहेत व राहतील) असे त्यांनी सांगितले. गृहमंत्रालयात काम करणे म्हणजे ट्वेंटी ट्वेंटी सामन्यासारखे नसते तर तो कसोटी सामना असतो. तेथे भक्कम सुरुवात व मोठी खेळी आवश्यक असते, असे ते म्हणाले.

Story img Loader