२००२ मध्ये गुजरातमध्ये दंगल उसळली होती. नरोडा पाटिया गावात झालेल्या भीषण हत्याकांड प्रकरणात गुरूवारी सर्व ६९ आरोपींची मुक्तता करण्यात आली. या प्रकरणात गुजरात सरकारच्या माजी मंत्री माया कोडनानी आणि बाबू बजरंगी यांच्यासह ८६ आरोपी होते. नरोडा हत्याकांडात ११ लोकांचा मृत्यू झाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह २०१७ यांनी माया कोडनानी यांच्या बचावासाठी साक्ष दिली होती ते कोर्टात गेले होते. अहमदाबाद या ठिकाणी असलेल्या नरोडा गावात झालेल्या हत्याकांडात २१ वर्षांनी कोर्टाने निर्णय दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय आहे आहे नरोडा पाटिया हत्याकांड प्रकरण?

गुजरातच्या गोध्रा या ठिकाणी २७ फेब्रुवारी २००२ ला एका ट्रेनला आग लावली गेली. या ट्रेनमधल्या ५८ लोकांचा मृत्यू झाला होता. या ट्रेनमध्ये कारसेवकही बसले होते. या घटनेच्या एक दिवसानंतर २८ फेब्रुवारीला विश्व हिंदू परिषदेने गुजरात बंदची हाक दिली होती. याच दिवशी अहमदाबादच्या नरोडा गावात जी दंगल उसळली त्यात ११ जणांचा मृत्यू झाला. या सगळ्यांना जिवंत जाळण्यात आलं होतं.

२८ फेब्रुवारी २००२ ला सकाळी ९ वाजता शांततेचं वातावरण होतं. मात्र अचानक जमाव आला आणि दगडफेक सुरू झाली. तसंच जाळपोळीच्या घटनाही घडल्या. नरोडा गावात जे दंगे झाले त्यानंतर राज्यभरात दंगली सुरू झाल्या. या घटनेनंतर २७ शहरांमध्ये संचारबंदी लावण्यात आली होती.

नरोडा हत्याकांड प्रकरणात आरोपींच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम ३०२ (हत्या), कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न), कलम १४३ (बेकायदेशीररित्या जमाव जमणं), कलम १४८ (घातक हत्यारांसह दंगल ) आणि कलम १२० (गुन्ह्याचा कट रचणं) या कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर काय घडलं?

नरोडा हत्याकांड प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर २००८ ला म्हणजेच घटना घडल्यानंतर सहा वर्षांनी एसआयटी अर्थात विशेष तपास पथक नेमण्यात आलं होतं. या प्रकरणाची सुनावणी २००९ मध्ये सुरू झाली होती. हत्याकांड प्रकरणात १८७ जणांची चौकशी करण्यात आली. तसंच ५७ प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवण्यात आले. नरोडा पाटिया हत्यांकाड प्रकरणात एकूण ८६ लोकांवर आरोप निश्चित करण्यात आले. या आरोपींपैकी १८ जणांचा मृत्यू मागच्या २१ वर्षांमध्ये झाला आहे.

माया कोडनानी कोण आहेत?

माया कोडनानी यांचं पूर्ण नाव माया सुरेंद्रकुमार कोडनानी असं आहे. माया कोडनानी या पेशाने स्त्री रोग तज्ज्ञ आहेत. त्यांनी डॉक्टर म्हणून बडोदा मेडिकल कॉलेजमध्ये दीर्घकाळ काम केलं. १९९५ मध्ये माया कोडनानी राजकारणात आल्या. सुरूवातीला त्यांनी महापालिकेची निवडणूक लढवली. तर नंतर गुजरातच्या १२ व्या विधानसभा निवडणुकीत त्यांना नरोडाहून तिकिट देण्यात आलं. त्या नरोडातून निवडूनही आल्या. गुजरात सरकारमध्ये त्यांना महिला आणि बालविकास मंत्री हे पद देण्यात आलं होतं.

माया कोडनानी यांनी आपल्या बचावात हे सांगितलं होतं की नरोडामध्ये जेव्हा दंगल उसळली तेव्हा मी गुजरात विधानसभेत होते. त्या दिवशी दुपारी मी सरकारी रूग्णालयात गेले होते. तिथे मी कारसेवकांच्या मृतदेहांची पाहणी केली. मात्र काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी हे सांगितलं की ज्या दिवशी दंगल उसळली त्यादिवशी माया कोडनानी या नरोडामध्येच होत्या. त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या गर्दीला दंगल करण्यासाठी चिथावलं होतं. माया कोडनानी यांच्यावर हा देखील आरोप आहे की गोध्रा कांड झाल्याने त्यांनी मुस्लिमांची हत्या करण्यासाठी नरोडात लोकांना भडकवलं होतं. मात्र आता माया कोडनानीसहीत सगळ्या आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is naroda mass murder case who is maya kodnani read the news in detail scj
Show comments