अयोध्येत राम मंदिर उभारण्यात यावं, या मागणीसाठी मागील कित्येक दशकांपासून संघर्ष सुरू होता. या मागणी राजकीय परिणाम सुद्धा दिसून आले होते. राम मंदिरासाठी आंदोलन करणारा पक्ष आज केंद्रात सत्तेत आहे आणि या आंदोलनातील नेते संसदेत खासदार आहेत. भाजपानं राम मंदिर उभारण्याची पहिल्यांदा मागणी केली होती, पालमपूर येथे झालेल्या अधिवेशनात. काय होता तो प्रस्ताव? त्यावर टाकलेला प्रकाशझोत…

राम मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होत आहे. यातही योगायोग असा आहे की, केंद्र आणि राम मंदिर उभं राहतंय त्या उत्तर प्रदेशात असं दोन्हीकडे भाजपाचंच सरकार आहे. राम मंदिर उभारणार असं एक आश्वासन भाजपाच्या निवडणुकीच्या अजेंड्यात नेहमी असायचं. हे आश्वासन कसं अजेंड्यात आलं?

आणखी वाचा- प्रभू रामचंद्रांसाठी बलिदान: साबरमती एक्स्प्रेसमधून बचावलेल्या कार सेवकांची गोष्ट

वर्ष होतं १९८९. हिमाचल प्रदेशातील पालमपूर येथे भाजपाचं अधिवेशन झालं. तेव्हा लालकृष्ण आडवणी भाजपाचे अध्यक्ष होते. त्या काळात लालकृष्ण आडवाणी व अटल बिहारी वाजपेयी ही राजकीय जोडी भारताच्या राजकारणात महत्त्वाची मानली जात होती. याच अधिवेशनात पहिल्यांदा राम मंदिर उभारणीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यानंतर राम मंदिर हे भाजपाच्या अजेंड्यातील महत्त्वाची गोष्ट बनली.

त्याच वर्षी जूनमध्ये झालेल्या भाजपाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला की, भाजपा राम जन्मभूमी आंदोलनाचं जाहीरपणे समर्थन करेल. त्यापूर्वी विश्व हिंदू परिषद या आंदोलनाचं नेतृत्त्व करत होती. त्यानंतर २५ सप्टेंबर १९९० मध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीदिनी लालकृष्ण आडवाणी यांनी गुजरातमधील सोमनाथ ते अयोध्या अशी रथ यात्रा काढली. या रथयात्रेत लाखो कारसेवक त्यांच्यासोबत सहभागी झाले होते.

आणखी वाचा- कार सेवा म्हणजे काय? नक्की काय केलं देशभरातल्या कारसेवकांनी?

ही रथयात्रा २३ ऑक्टोबर १९९० रोजी समस्तीपूर येथे लालू यादव यांच्या सरकारनं रोखली. त्यावेळी आडवाणी पोलिसांनी ताब्यात घेतलं. आडवाणी यांना अटक केल्यानंतरही कारसेवक अयोध्येच्या दिशेनं रवाना झाले. पुढे मुलायम सिंह यादव यांच्या सरकारनं कारसेवकांना अटक करण्याचे आदेश दिले. याच काळात झालेल्या निवडणुकीत उत्तर प्रदेशात राजकीय समीकरण बदललं. कल्याण सिंह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनले. दुसरीकडे केंद्रात राजीव गांधी यांच्या हत्येनंतर पी.व्ही नरसिम्हा राव पंतप्रधान बनले.

आणखी वाचा- राम मंदिराचा मुद्दा ते केंद्रात सत्ता, जाणून घ्या भाजपाचा प्रवास

पुढे ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यात आली. देशभरात दंगे भडकले. कल्याणसिंह यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. विशेष म्हणजे राम मंदिर आंदोलनाशी जोडून घेतल्यानंतर भाजपा राजकारणात स्थिर होऊ लागली होती. बाबरीच्या घटनेनंतर १९९६, १९९८ आणि १९९९ मध्ये झालेल्या निवडणुकीत हे चित्र बघायला मिळालं. अटल बिहारी वाजपेयी आधी १३ दिवसांसाठी, नंतर १३ महिन्यांसाठी पंतप्रधान बनले. त्यानंतर वाजपेयी साडेचार वर्ष ते देशाचे पंतप्रधान राहिले.

Story img Loader