Baba Ramdev on Sharbat Jihad: बाबा रामदेव यांनी एक धक्कादायक दावा केला असून त्यांच्या विधानामुळे आता नवीन वाद निर्माण होऊ शकतो. पतंजलीच्या फेसबुक पेजवर पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये बाबा रामदेव यांनी सरबत जिहादचा उल्लेख केला आहे. सोशल मीडियावर सरबत जिहाद म्हणजे काय? याची चर्चा आता सुरू झाली आहे. या व्हिडीओमध्ये रामदेव बाबा यांनी दावा केला की, बाजारात लोकप्रिय असलेल्या सरबतच्या कंपन्या त्यांच्या नफ्यातील मोठा हिस्सा मशीद आणि मदरसे बनविण्यासाठी देत आहेत. त्यामुळे या सरबतांऐवजी पतंजलीचा गुलाब सरबत विकत घेण्याचा आग्रह त्यांनी केला.

पतंजलीच्या अधिकृत पेजवर शेअर केलेल्या व्हिडीओबरोबर एक कॅप्शनही लिहिण्यात आली आहे. ज्यात म्हटले की, सरबत जिहादच्या नावावर विकल्या जाणाऱ्या टॉयलेट क्लीनर आणि कोल्ड ड्रिंकसारख्या विषारी पेयांपासून आपले कुटुंबिय आणि मुलांना वाचवा. घरी फक्त पतंजलीचा सरबत आणि ज्यूस आणा.

बाबा रामदेव पुढे म्हणाले की, जे लोक उन्हाळ्यात तहान भागविण्यासाठी बाजारातील सॉफ्ट ड्रिंक पित आहेत, ते खरंतर टॉयलेट क्लीनर सारखे विषारी आहे. ही पेये आरोग्यसाठी अतिशय हानिकारक आहेत.

बाबा रामदेव यांनी यावेळी एका सरबत बनविणाऱ्या कंपनीचा उल्लेख केला. ते पुढे म्हणाले की, या कंपनीच्या नफ्यातून मशीद आणि मदरसे बनविले जातात. तुम्ही जर याप्रकारचे सरबत घेत असाल तर तुम्हीही मशीद आणि मदरसे तयार करण्यासाठी मदत करत आहात. पण जर तुम्ही आमच्या कंपनीचे सरबत घेतले तर त्यातून गुरूकूल, आचार्यकुलम, पतंजली विश्वविद्यालय आणि भारतीय शिक्षा बोर्ड बांधण्यासाठी मदत होणार आहे.

बाबा रामदेव यांनी सरबत जिहादची तुलना लव्ह जिहाद आणि वोट जिहादशी केली. काही लोक लव्ह जिहाद आणि वोट जिहादपासून सांभाळून राहण्याचा सल्ला देतात. त्यांनी आता सरबत जिहादपासून सांभाळून राहण्याचाही इशारा द्यायला हवा.

बाबा रामदेव यांच्या या विधानानंतर आता जोरदार चर्चा झडत आहे. रामदेव यांच्या व्हिडीओला फेसबुकवर कोट्यवधी व्ह्यूज मिळाल्या आहेत. एका युजरने म्हटले की, आता रामदेव बाबा सरबत विकण्यासाठी जिहादचा आधार घेत आहेत. तसेच काही युजर्सनी म्हटले की, रामदेव बाबा यांचा व्यवसाय मंदावला आहे. त्यामुळे ते अशाप्रकारचे वादग्रस्त विधान करत आहेत.