बागेश्वर धाम सरकारचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री सध्या खूप चर्चेत आहेत. सध्या ते छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे प्रवचन सांगत आहेत. या प्रवचनाला राजकीय नेत्यांसह हजारो लोक गर्दी करत आहेत. अलिकडेच ते प्रवचनासाठी नागपूर येथे आले असता अंधश्रद्धा निर्मूलन समितीने धीरेंद्र शास्त्री यांच्या चमत्कारिक शक्तींना आव्हान दिलं होतं. अनिसने धीरेंद्र शास्त्री यांना त्यांच्या चमत्कारिक शक्ती जाहीरपणे सिद्ध करण्याचं आव्हान दिलं होतं, अन्यथा त्यांच्याविरुद्ध पोलीस एफआयआर दाखल करण्यात येईल, असंही समितीने म्हटलं होतं.
धीरेंद्र शास्त्री यांनी त्यांच्या दिव्यदृष्टीचा चमत्कार सिद्ध करून दाखवावा आणि ३० लाख रुपयांचे बक्षीस घेऊन जावे, असे आव्हान अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय संघटक प्रा. श्याम मानव यांनी दिले आहे. शास्त्रींनी हे आव्हान स्वीकारलं, परंतु ते नागपूरहून पळून गेले. आता ते आव्हान देणाऱ्यांना टोमणे मारत आहेत.
कोण आहेत धीरेंद्र कृष्ण शास्त्री?
धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा जन्म ४ जुलै १९९६ रोजी मध्य प्रदेशमधल्या छतरपूरजवळील गडागंज या गावात झाला. शास्त्री यांचं कुटुंब गडगंजमध्ये राहात आहे. तेथेच प्राचीन बागेश्वर धाम मंदिर आहे आणि त्यांचं वडिलोपार्जित घरदेखील आहे.
हेही वाचा >>> ‘भक्तांच्या आड का लपता, धमक असेल तर नागपुरात या’; प्राध्यापक मानव यांचे धीरेंद्र कृष्ण महाराजांना पुन्हा आव्हान
धीरेंद्र शास्त्रींची संपत्ती किती?
धीरेंद्र शास्त्री यांची दर महिन्याची कमाई जवळपास ३.५ लाख रुपये इतकी आहे, अशी माहिती झी न्यूजने दिली आहे. शास्त्री एक कथा किंवा प्रवचन सांगण्यासाठी ८ हजार रुपये घेतात. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांची नेटवर्थ ९ कोटी रुपये इतकी सांगितली जात आहे. परंतु शास्त्री यांचं म्हणणं आहे की, ते या पैशांचा वापर भुकेल्या लोकांना अन्न देण्यासाठी आणि गरजूंच्या मदतीसाठी करतात. तसेच ते एक गोशाळा देखील चालवतात.
हेही वाचा >>> धीरेंद्र महाराज-अंनिस वादात आता राम कदमांची उडी; म्हणाले, “स्वत:ला अंधश्रद्धा निर्मुलनकार म्हणवून घेणारे…”
अंधश्रद्धेला प्रोत्साहन दिल्याचा आरोप
बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर अंधश्रद्धेला प्रोत्साहन दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्यावर नागपुरात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई न केल्यास न्यायालयात धाव घेणार असल्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे म्हणणे आहे.