बर्फाळ प्रदेशातील हिममान म्हणजे यती बद्दलच्या चर्चा अनेकदा कानावर पडतात ऐकतो. इंटरनेटवरही यती सर्च केल्यावर अनेक व्हिडीओ आणि कथा समोर येतात. कायमच एक गूढ म्हणून राहिलेल्या यतीविषयी अनेक कथाही रंगवून सांगितल्या जातात. मात्र, आता हिमालयातील बर्फाळ प्रदेशात हिममानवाच्या पावलाचे ठसे आढळले आहेत. भारतीय सैन्यानेच ट्विटरद्वारे हे फोटो प्रसिद्ध केले आहे. यामुळे हिममानवाच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे. मात्र हिमामानव म्हणजे नक्की काय आणि काय आहे या हिममानवाच्या गूढ रहस्याचा इतिहास याची उत्सुक्ता अनेकांना लागलेली असते. यावरच टाकलेली नजर…
मागील अनेक दशकांपासून अनेकांनी आपण यती पाहिल्याचा दावा केला आहे. मात्र कोणालाही त्याचा ठोस पुरावा देत आला नाही. म्हणून वैज्ञानिक हिममानव म्हणजे एक दंतकथा असल्याचे मानतात. मात्र हिमलायाच्या कुशीत राहणाऱ्या अनेकांनी यती पाहिल्याचा दावा केला आहे. भारत, नेपाळ आणि तिबेटच्या भूप्रदेशावर पसरलेल्या बर्फाळ भागामध्ये यती पाहिल्याचे अनेकजण सांगतात.
नेपाळी दंतकथा
नेपाळमधील दंतकथांमध्ये यतीचा उल्लेख त्रास देणारा हिमामानव असा आहे. हा एखाद्या मोठ्या अस्वलासारखा दिसतो. सामान्य पुरुषाच्या उंचीहून अधिक उंच असणारा हा प्राणी दोन पायांवर थोडा पोक काढून चालतो. हा प्राणी हिमलयात, सैबेरियात आणि मध्य तसेच पूर्व आशियामध्ये अढळतो.
यतीबद्दलचे समज…
१९ व्या शकतापर्यंत बर्फाळ प्रदेशातील स्थानिक लोक यतीची पुजा करायचे असे मानले जायचे. हा प्राणी एखाद्या मोठ्या माकडासारखा दिसतो असे हे लोक मानतात. स्वत:च्या संरक्षणासाठी यतीकडे दगडापासून बनवलेले मोठे हत्यार असते तसेच सळसळत्या पानांच्या आवाजासारखा त्याचा आवाज असतो असा या लोकांचा समज आहे.
१९२० च्या दशकापासून हिमालयामध्ये भटकंतीसाठी जाणाऱ्या गिर्यारोहकांनाही यती शोधण्याचा मोह आवरला नाही. मागील शतकभरामध्ये अनेक गिर्यारोहकांनी यतीला शोधण्यासाठी हिमालयामध्ये पायपीट केली आहे. मात्र माणसाच्या नजरेतून निसटणारा हिममानव म्हणून लोकप्रिय असणारा हा प्राणी कधीच कोणाला सापडला नाही.
मागील अनेक दशकांमध्ये यतीला पाहिल्याचा दावा अनेकांनी केला आहे. काही वेळेस त्याच्या पावलांचे ठसे तसेच केस सापडल्याचेही सांगितले गेले. मात्र इतक्या वर्षांमध्ये या प्राण्याचा एकही फोटो कोणालाही काढता आलेला नाही.
नामकरण
हिमालयातील लोक या प्राण्याला यती किंवा मेह तेह या नावाने ओळखतात. तिबेटीयन भाषेत यतीला मीची म्हणतात. मीचीचा अर्थ अस्वलासारखा माणूस असा होतो. तिबेटमध्येच यतीला डुझ-थे या नावानेही ओळखले जाते, ज्याचा अर्थ हिमालयातील गडद रंगाचे अस्वल असा होतो. तिबेटीयन भाषेत ‘मिगोई’ (रानटी माणूस) तर नेपाळी भाषेत ‘बन मानची’ (जंगली माणूस), कंग आदमी आणि मिरका अशा नावानेही या प्राण्याला वेगवेगळ्या भागांमध्ये ओळखले जाते.
यती आणि मनोरंजन
जगातील सर्वात लोकप्रिय कार्टून सिरीजपैकी एक असणाऱ्या ‘द अॅडव्हेंचर्स ऑफ टीनटीन’मध्येही यतीसंदर्भातील भाग दाखवण्यात आला होता. यतीचं चित्रण या मालिकेमध्ये मानवी प्रवृत्ती असणारा प्राणी असं दाखवण्यात आले होते. रानटी किंवा हिंसक नाही तर मानवाप्रमाणेच समजुदार यती या मालिकेत दाखवण्यात आला होता. २०१६ मध्ये एका लोकप्रिय वाहिनीवर ‘हंट फॉर द यती’ ही चार भागांची विशेष मालिका दाखवण्यात आली होती. परदेशात यती विषयावर अनेक सिनेमे बनवण्यात आले आहेत. बीगफूट, यती: कर्स ऑफ द स्नो डेमोन, रेज ऑफ द यती, स्मॉलफूट, अॅबोमिनेबल, योको, स्नो बिस्ट, द स्नो क्रिचर, द मिस्टेरियस मॉनस्टर, हाफ ह्युमन, स्नो बिस्ट, मॅन बिस्ट, यती: द ट्वेटियथ सेंच्युरी जायंट असे अनेक सिनेमे या विषयावर बनवण्यात आले आहेत.
यती आणि वैज्ञानिक अभ्यास
मागील अनेक दशकांपासून यतीची जोरदार चर्चा होत असली तरी वैज्ञानिकांना यतीच्या अस्तित्वाचे ठोस पुरावे सापडलेले नाहीत. २०१७ साली संशोधकांच्या एका गटाने अनेक ठिकाणांहून यतीच्या अस्तित्वाचे पुरावे म्हणून जे काही सापडले ते सर्व पुरावे गोळा केले. मात्र संशोधनाच्या शेवटी ते अस्वलाचे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. २००८ साली अमेरिकेमधील दोन जणांनी आम्हाला अर्ध मानव आणि अर्ध माकड असणाऱ्या प्राण्याचे अवशेष मिळाले असल्याचे सांगितले. मात्र तपासाअंती तो गोरीलासारखा दिसणारा पोशाख निघाला.